रविवार विशेष - माझी माय सरोसती..
..
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2023-12-03 12:49:19

आज ३ डिसेंबर, ज्येष्ठ कवीयत्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म जळगांव जवळील असोदे गावचा. मराठी कवितेच्या प्रांतात फेरफटका मारताना आपल्याला भावतात त्या बहिणाबाई चौधरी यांच्या कविता. बहिणाबाई चौधरी ह्या शिकलेल्या नव्हत्या.
तरीही त्यांनी रचलेल्या कविता आपल्याला अंतर्मुख करतात.असोदे गावातील प्रसिद्ध महाजन कुटुंबात त्यांचा जन्मा झाला. वयाच्या तेराव्या वर्षी बहिणाबाईचा, जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. पण अगदी तरुण वयातच त्यांना वैधव्य आले. सुरुवातीचे एकत्र कुटुंब वेगळे झाले आणि नव-याच्या मृत्युनंतर बहिणाबाईना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला.
त्यांना एक कन्या काशी आणि दोन पुत्र ओंकार आणि सोपान असे अपत्य झाले. शेतीची, मोलमजुरीची काम करता करता त्यांना जी कवन सुचली ती पुढे जाऊन अजरामर तर ठरलीच, परंतु प्रत्येक स्त्री मनाचा आरसा झाली. आपल्याकडे लोकगीतांची मोठी परंपरा आहे. त्यात भारुड, गौळण, जात्यावरच्या ओव्या या फार प्रसिद्ध आहेत.
पूर्वीच्या काळी स्त्रियांना सामाजात कोणतेही स्थान नव्हते. चूल आणि मूल हेच काय ते त्यांचे जग. अशावेळी सासरच्या मंडळींचे टोमणे, वाद यामुळे त्याची मानसिक कुचंबणा होत असे. त्यांना व्यक्त होण्याचा हक्क तर नव्हताच पण मार्ग ही नव्हता. पण बहिणीबाईनी यावर उपाय शोधला तो म्हणजे कविता रचण्याचा.
मग विषय कोणताही असो तो बहिणबाई आपल्या सहज सोप्या शैलीत मांडत राहिल्या. "धरत्रिले दंडवत " ह्या कवितेत त्या आपल्या काळ्या मातीला आई मानतात आणि तीच कस आपल्यावर ऋण आहे ते सांगतात." खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला"अस म्हणत त्या एका पक्षिणीच मातृत्व किती मोठं आहे याची जाणीव करून देतात.
सणवाराचे देखील वर्णन त्यांनी आपल्या बोली भाषेत केले आहे. अक्षय्य तृतीया हा सण. त्याच आणि माहेरवाशिणीच खास नातं त्यांनी आपल्या कवितेतून मंडल आहे.
त्या म्हणतात, " अखाजीचा आखाजीचा मोलाचं सण देखा जी
लिंबा वरी, लिंबा वरी बांधला छान झोका जी."
त्यांच्या कविता या प्रामुख्याने अहिराणी या बोली भाषेतील पाहायला मिळतात. ज्यात रोजच्या जीवनातील प्रसंग, शेती, सण, कुटुंबातील सदस्यांसोबतचा संवाद पाहायला मिळतो. त्याच सोबत कधी सासुर वाशिणीच दुःख आपल्या समोर येत, तर कधी शेत मजुरी करणाऱ्या स्त्री च मनोगत.
" मन " या कविते द्वारे बहिणाबाई आपल्याला आश्चर्य चकित करून टाकतात. मोठ मोठे वैद्य, तज्ज्ञ ज्या मनाचा ठाव सांगू शकत नाही, अशा मानवी मनाचा अचूक वर्णन त्या सहज करतात.
" मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर
किती हाकल हकाल, फिरी येत पिकावर"
स्त्री मनाचा अतिशय हळवा कोपरा म्हणजे तिच माहेर, आणि या महेराच वर्णन खास बहिणबाईच्या शैलीत ऐकण म्हणजे पर्वणीच. त्या एका स्त्री सोबत एका योगी पुरुषाच्या संवाद रुपात मांडतात की,
योगी - सदा माहेर माहेर, गाणं तुझ्या ओठी. मंग सासराले आली
सांग कश्यासाठी.
यावर तरी स्त्री उत्तर देते. " ऐक योग्या, दे रे ध्यान. ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरा साठी, माय सासरी नांदते".
अशिक्षित असूनही स्त्री मनाच भावविश्व रंगवणाऱ्या जेष्ठ कवयत्री बहिणा बाई चौधरी यांच्या पवित्र स्मृतीस शतशः प्रणाम.
- श्रद्धा कराळे (लेखिका वारली चित्रकार आहे )