भावनांचा सहज उद््‌गार

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 0000-00-00 00:00:00

कविता ही अस्वस्थतेचे फलित आहे, वेदनेचे दृश्य स्वरूप आहे, करुणेचे साकार रूप आहे. ही अस्वस्थता कवीकडून कवितेत आणि मग वाचकांत संक्रमित होते, तेव्हा ती वैयक्तिक राहत नाही. बाळू दुगडूमवार यांचा 'अस्वस्थायन आणि चंद्रदर्शन' हा कवितासंग्रह पानापानांत अस्वस्थता भरलेला आहे. 

ती अस्वस्थता वाचकाला वेढून टाकते. सगळा आसमंत अस्वस्थ करून टाकते, इतका की, तर्काचे टेकू ढासळतात, सत्य तोंड लपवते, करुणेच्या बागा सुकून जातात, असे असले तरी चंद्रदर्शन होणार याची कवीला खात्री आहे. ब्याऐंशी कवितांचा हा संग्रह विविध भावभावनांना स्पर्श करतो. स्वतःचा शोध घेत राहतो, तळ हरवत जातो. 

कोरोना नावाचा भयाचा काळ शक्य नसलेल्या शक्यता तपासतो, भेदून टाकतो, भेदरवतो, माणुसकीचे बंध कमकुवत करून टाकतो. तेव्हा कवी हळवा होतो. म्हणतो, आता तुला विसरता आले पाहिजे, हुंदक्यांचे लोळ कंठात रोखता आले पाहिजे, असे म्हणत यातनांचे झुले झुलतो. 

उत्क्रांती होत होत सभ्य झालेला माणूस केव्हा रानटी होईल, रक्तपिपासू होईल सांगता येत नाही. अन्यथा वेगवेगळ्या वेळी माणुसकीचे धिंडवडे निघालेले पाहावे लागले नसते आणि कवी व्यथित झाला नसता. आजार बरा झाला तरी काही रोगजंतू वेगवेगळ्या ठिकाणी दडून राहतात आणि त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होताच पुन्हा डोके वर काढतात. यातला मोठा जंतू म्हणजे माणसातला रानटीपणा. 

हा केव्हा डोके वर काढील आणि कोण बळी ठरेल हे सांगणे कठीण आहे. यात केनेडी, गांधी, दाभोलकर, कलबुर्गी असतात. यामुळे विचार मरत नाहीत हे खरे असले, तरी रानटीपणाचे जंतूही संपत नाहीत, हा तर सार्वत्रिक अस्वस्थतेचा विषय असला पाहिजे. त्यामुळे गांधी कधी मरत नसतो, सरत नसतो हा विश्वास कवीच्या मनात जागता राहतो.
गेंड्याची कातडी असलेल्या सत्ताधीशांपुढे पाय रोवून उभ्या राहिलेल्या आंदोलनजीवींचा निर्धार अगतिक वाटत नाही. कारण तो स्वतःच्या हक्कासाठी आहे, ती याचना नाही. कवी जेव्हा आतल्या कोलाहलाचा अन्वयार्थ लावू पाहतो, तेव्हा अधिकाधिक हळवा होत जातो. मुलीचे बाई होणे, बाईला माणूस न समजणे या बाबी कवीबरोबर वाचकालाही छळतात. 

'झाडाचे काळीज बनून कवीला जंगल होता आले पाहिजे' हे तर खूपच वेगळ्या पातळीवरचे प्रतिपादन आहे. माझ्यावर देश चालतो, पण माझ्यासाठी देश चालत नाही, हे कवीने मांडलेले भीषण वास्तव आहे. धर्माचे सगळे रंग नष्ट व्हावे आणि सगळे ब्लॅक अँड व्हाइट व्हावे ही कवीची अपेक्षा नकळत आपलीच वाटू लागते. 

डॉ. दुगडूमवारांची प्रत्येक कविता इतकी विचारप्रवर्तक आहे की, त्यावर स्वतंत्र लेख लिहिला जावा. कवीने शेतकऱ्यांची व्यथा अनुभवली असली पाहिजे इतके ते पोटतिडकीने त्याच्या प्रश्नांना भिडतात. 'ओली ओवाळणी' वाचताना याचा प्रत्यय येतो. बैलाला पाठचे भाऊ म्हणताना त्यांच्या या सहृदयतेचा स्तर कमालीचा उंचावलेला आहे. 

सामाजिक जाणीवाही अतिशय टोकदार आहेत. संग्रहातल्या विविध आकृतीबंधातल्या इतर कविता केवळ रचना नाहीत व्यामिश्र भावनांचा सहज उद्गा‌र आहेत. श्री. दा. गो. काळे यांची प्रस्तावना नेमकी, नेटकी  चिकित्सा करणारी आहे. डॉक्टरांचा पहिला संग्रह दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. मात्र पुढील संग्रहाने एवढा वेळ घेऊ नये ही अपेक्षा.


कवितासंग्रहाचे नाव : 
अस्वस्थायन आणि चंद्रदर्शन
कवी : डॉ. बाळू दुगडूमवार 
पृष्ठसंख्या : ९६, मूल्य : १५० ₹
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई.