दोन दिवसांत ई-केवायसी आधार सीडिंग पूर्ण करा
पी एम किसान योजना प्रलंबित लाभार्थ्यांना आवाहन
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

उजनी : सिन्नर तालुक्यातील पी एम किसान योजनेंतर्गत प्रलंबित ई-केवायसी व आधार सीडिंग नऊ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे, अन्यथा त्यानंतरची प्रलंबित ई- केवायसी व आधार सीडिंगची नावे रद्द करण्यात येतील. पी एम किसान योजनेतून नावे रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी दिली. पी.एम. किसान योजनेंतर्गत २०१९-२० पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे ई- केवायसी प्रमाणीकरण बँक खाते आधार संलग्न करणे व भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे याबाबी केंद्र शासनाने अनिवार्य केलेल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई- केवायसी पूर्ण करणार नाहीत, तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाहीत, त्यांची नावे पी एम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहेत. ई-केवायसी करण्याकरिता मे-जून-जुलै व ऑगस्ट महिन्यांत कृषी विभागामार्फत मोहीम राबविण्यात आलेली आहे. अद्यापही तालुक्यातील सात हजार ३६२ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.
चार हजार ६८७ लाभार्थ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. वारंवार संपर्क करूनही ई-केवायसी व आधार सीडिंग करण्याकरिता प्रतिसाद मिळत नाहीत, अशा लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात येईल. ई-केवायसीसाठी मोबाईलवरून ओटीपी बेस सामाईक सुविधा केंद्रामार्फत मोबाईलवरून PM KISAN GOL ॲपद्वारे चेहरा पडताळणी/प्रमाणीकरण या तीन मार्गाने करता येईल.
तसेच बँक खाते आधार संलग्न करण्याकरिता इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडणे, स्वत:चे बँक खाते आधार संलग्न करणे याबाबींचा वापर करून पी एम किसान योजनेचा लाभ घेता येईल. राहिलेल्या लाभार्थ्यांची नावे, ग्रामपंचायतसंबंधित गावच्या कृषी सहाय्यकाकडे मिळेल.