महिला व बालकल्याण, बांधकामसह आरोग्य विभागाचे वेतन वेळेत का नाही?

शासनाने मागविला जिल्हा परिषदेकडे अहवाल

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षणसह महत्त्वाच्या विभागांचे वेतन १ तारखेला होत आहे;  परंतु बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागांचे वेतन वेळेत होत नसल्याच्या तक्रारींबाबत शासन ॲक्टिव मोडवर आले आहे.  राज्य शासनाने याबाबत जिल्हा परिषदेला पत्र पाठवत वेतन वेळेत का होत नाही? याचा जाब विचारत अहवाल मागविला आहे. 

दरम्यान, ५ तारखेला वेतन करण्याबाबतचे नियोजनही सादर करा, असे आदेश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत.  जुलैपासून वेतनाबरोबरच निवृत्तिवेतन वेळेत अदा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागांना दिले होते.

 त्यानुसार पंचायत समित्यांतील दहा हजार ४८० प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचे ऑगस्टचे वेतन १ तारखेला वितरित केले. मात्र, बांधकाम, आरोग्य व महिला- बालकल्याणमधील कर्मचाऱ्यांचे वेतन १५ तारीख होऊनही होत नसल्याच्या तक्रारी आहेत. विभागांचे वेतन तीन-तीन महिने थकले आहे.

 यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी शासनस्तरावर तक्रार केली. कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत होण्यासाठी आपल्या स्तरावरून केलेले प्रयोजन याचा स्वयंस्पष्ट कारणासह अहवाल १५ सप्टेंबरपर्यंत शासनाला सादर करावा, असेही शासनपत्रात नमूद केले आहे.