येवल्यात दीड लाखांचा गुटखा जप्त
अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम, तालुका पोलिसांची कामगिरी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

येवला : शहर व तालुक्यात ठिकठिकाणी गुटखा विक्री होत आहे. त्याअनुषंगाने तालुका पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत लाखाचा अवैधरित्या विक्रीसाठी जाणारा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असून, जिल्हा पोलीस प्रमुखांनीदेखील अवैध व्यवसायावर काटेकोर बंधने घातली आहेत. यामुळे तालुका पोलिसांनी अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम सुरू केली असून, सुमारे एक लाख ६६ हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरहान बिलाल शेख (वय २६, रा. परदेशपुरा,येवला) व समीर शकील शेख (२१, रा. कचेरी रोड, येवला) या दोघांना अटक केली आहे. तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अंदरसूल दूरक्षेत्रात गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, अंढागळे, दौलत ठोंबरे, राजेंद्र बिन्नर, आबा पिसाळ, गणेश बागूल, पवार यांचे पथक तयार करण्यात आले.
पथकाने सापळा रचून धामणगाव शिवारात येवला- भारम रस्त्यावर संशयित वाहनाचा पाठलाग करून स्कूटी (एमएच १५, जेजे ३२९४) वरून जाणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तंबाखू व गुटखासदृश पानमसाला हस्तगत करण्यात आला आहे.
यात ७६ हजार ८०० रुपयांचा प्रीमियम राजनिवास सुगंधित पानमसाला ४०० पॅकेट, तर १९ हजारांचा प्रीमियम झेड एल जाफरानी जर्दाचे ४०० पॅकेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच सुझुकी कंपनीची बर्गमॅन स्कूटी मोटारसायकल असा एकूण एक लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पुढील तपास करत आहेत.