ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तातडीने वसतिगृहे सुरू करावीत

तैलिक महासभा युवक आघाडीचे निवेदन

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

सातपूर : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १०० मुले व १०० मुली या मर्यादेत प्रतिजिल्हा २०० याप्रमाणे ३६ जिल्ह्यांसाठी एकूण जिल्हानिहाय दोन याप्रमाणे ७२ वसतिगृहे तातडीने सुरू करण्यात यावीत यासंदर्भात नाशिकचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिंगळे व शिष्टमंडळाने निवेदन दिले. 
ओबीसी समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरात वास्तव्य करण्याच्या शासकीय सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने अनेक ग्रामीण, होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. 

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अशाच प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न केले गेले. यावेळी नाशिक शहर तेली समाज शहराध्यक्ष उत्तमराव सोनवणे, तैलिक महासभा महिला जिल्हाध्यक्ष सुनीता बोरसे, युवक शहराध्यक्ष अरुण क्षीरसागर, युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर कस्तुरे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बागडे, प्रसिद्धी प्रमुख विकी बागूल, कैलास पाटील उपस्थित होते.