'कश्यपी'चे प्रकल्पग्रस्त मनपाच्या कायम सेवेत रुजू
..........
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00
नाशिक : महापालिकेच्या सेवेत बिगारी म्हणून दाखल झालेल्या 'कश्यपी'च्या ३६ पैकी ११ प्रकल्पग्रस्तांना त्या पदावर कायम सेवेत सामावून घेण्यात आले. शिवसेना ठाकरे गट महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश आहे.
कश्यपी धरणासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या, त्या ३६ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत बिगारी संवर्गात १५ फेब्रुवारी २०१२ ला सामावून घेतले होते. त्यांचा दोन वर्षांचा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने व खातेप्रमुखांनी सादर केलेल्या मूल्यमापन अहवालानुसार त्यांचे कामकाज समाधानकारक असल्याने पहिल्या टप्प्यात ३६ पैकी ११ जणांना बिगारी संवर्गात कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आले आहे.
बिगारी पदाची सातव्या वेतन आयोगानुसारची वेतनश्रेणी १५ ते ४७ हजार अशी आहे.त्यात लेव्हल एक मूळ वेतन १५ हजार अधिक इतर भत्ते या सर्वांना एक मार्च २०२३ पासून लागू करण्यात आले, असे प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या नेमणूकपत्रात नमूद केले आहे.
ज्यांना कायम करण्यात आले त्यात निवृत्ती बेंडकोळी, मधुकर खाडे, किशन बेंडकोळी, बाळू मोंढे, लक्ष्मण वामन बेंडकोळी, सुनील मोंढे, तुळशीराम बेंडकोळी, रमेश खाडे, रमेश बेंडकोळी, पुंडलिक मोंढे, लक्ष्मण मधू बेंडकोळी यांचा समावेश आहे.