बचत गटांना उत्पादन विक्रीसाठी स्टॉल्स देणार

मंत्री भुजबळ : रानभाज्या, राखी महोत्सवास भेट

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

नाशिक : गंगापूरगाव परिसरात साकारत असलेल्या कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांस विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
पंचायत समितीच्या आवारात आयोजित उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाज्या व राखी महोत्सवास दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, पंचायत समिती गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले, कलाग्रामसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, या कालाग्राममध्ये १०० स्टॉल्स उभारले जाणार आहेत. दोन  ते तीन महिन्यांत कलाग्रामचे काम पूर्ण केले जाणार असून ते स्वयंसह्य बचतगट, महिला बचतगट, आदिवासी महिला उद्योजक यांच्यासाठी माफक दरात खुले केले जाणार आहेत. 

तसेच येवल्याच्या पैठणी केंद्रातदेखील हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. येथील प्रदर्शनात तृणधान्यांपासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ, सेंद्रिय खतातून पिकविलेल्या भाज्या, रानभाज्या, पाणवेलींपासून बनविलेल्या बहुउपयोगी कलाकुसरीच्या वस्तू, वेगवेगळ्या डिझाइनच्या राख्या ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंना ऑनलाइन मार्केट उपलब्ध होत आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.