सैन्यभरतीच्या नावाखाली तरुणांना लाखोंना गंडवले
रॅकेट पर्दाफाश, आरोपी अटकेत
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-14 18:20:47
अहमदनगर : , अहमदनगर जिल्ह्यातील 10 ते 12 युवकांसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार,पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्ली येथील शेकडो युवकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून फसविणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर भिंगार पोलीस आणि दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी कारवाई करत भांडाफोड केला आहे.
या प्रकरणी सत्यजित भरत कांबळे या आरोपीला श्रीरामपूर तालुक्यातून अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मी आणि माझे साथीदार लष्करात तसेच मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस येथे अधिकारी असून मी लष्करात तुमची भरती करून देतो, असं सांगत आरोपी सत्यजित कांबळे आणि त्याचे साथीदार अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांकडून प्रत्येकी 7 ते 8 लाख रुपये घ्यायचे. त्यानंतर, बनावट नियुक्ती पत्र आणि बनावट ओळखपत्र संबंधित तरुणांना दिले जायचे. एवढेच नव्हे तर कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्राबाहेर ट्रेनिंग कँपदेखील उभारले होते.
महाराष्ट्राबाहेर सैन्य भरतीसाठी उभारण्यात आलेल्या बोगस ट्रेनिंग कँपमध्ये तरुणांना बोलावून त्यांना तीन ते चार दिवसाची ट्रेनींग देखील दिली जात होती. आरोपींनी अशा तरुणांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान लष्कर भरती फसवणूकी संदर्भात नाशिक येथे राहणाऱ्या भगवान घुगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील लष्कर हद्दीत असलेल्या भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.