वावी परिसरातील पाच सराईत गुन्हेगार हद्दपार
सर्वांविरोधात दखलपात्र गुन्ह्यांच्या अनेक नोंदी
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-16 15:45:09
लोकनामा प्रतिनिधी
सिन्नर : तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना नाशिक व नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यात मारुती बस्तिराम दराडे, नवनाथ शिवाजी बोडके, अविनाश सोमनाथ आंधळे (तिघेही रा. खंबाळे) आदर्श प्रकाश कर्डक (रा. मनेगाव फाटा) आणि करण संतोष बेदाडे (रा. माळवाडी) यांचा समावेश आहे.
नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून, त्यानुसार वावी पोलिसांनी ही कारवाई केली.पाचही गुन्हेगारांविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात खून व चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगा रांची टोळीच दोन वर्षांपासून तालुक्यात गंभीर गुन्हे करण्यास सक्रिय झाली होती. या टोळीतील सदस्यांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मात्र त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तसेच त्यांची वाढती गुंडगिरी व दहशतीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वावीच्या सहाय्यक निरीक्षकांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार पोलीस अधीक्षक देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी या पाचही जणांना नाशिक व नगर जिल्ह्यातून शुक्रवार(दि. १३)पासून वर्षभराकरिता हद्दपार
केले आहे.
नाशिक, नगर जिल्ह्यात आढळल्यास कारवाई
हद्दपारीच्या कालावधीत संबंधित तडीपार नाशिक, नगर जिल्ह्यात अथवा सिन्नर तालुक्यात आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हद्दपारीच्या कालावधीत जिल्हा हद्दीत हे गुन्हेगार मिळून आल्यास त्यांच्यावर उचित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.