डीजे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सिन्नरच्या वावीवेस भागात अपघात;
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-16 18:12:02
लोकनामा प्रतिनिधी
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर शहरातील वावीवेस भागात डीजेच्या वाहनाने पुढे चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. शनिवारी (दि. १४) दुपारी झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेली पत्नी व पाच वर्षांचा नातू गंभीर जखमी झाले.
रघुनाथ वामन आव्हाड (वय ६०, रा. धुळवड, ता. सिन्नर) असे मृताचे नाव आहे. जनाबाई रघुनाथ आव्हाड (वय ५५), विराज रमेश आव्हाड (वय ५) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सिन्नरच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले. धुळवड येथील आव्हाड पती-पत्नी आपल्या पाच वर्षांच्या नातवासह दुचाकीने (एमएच १५, जीजी ३३६५) निफाड तालुक्यातील कुरडगाव येथे नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाले होते. वावी वेस भागातील वळणावर मागून आलेल्या डीजेच्या वाहनाने (एमएच ०४, डीएस ७५६३) आव्हाड यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रघुनाथ आव्हाड डीजेच्या वाहनाच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. त्यांची पत्नी आणि नातू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागल्याने जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक विस्कळित झाली. पोलिसांनी डीजे वाहनचालक नीलेश विठ्ठल सानप (वय २५, रा. निमगाव-सिन्नर, ता. सिन्नर) यास ताब्यात घेतले आहे. रुग्णवाहिकाचालक राहुल सिरसाठ यांच्या प्राथमिक माहितीवरून सिन्नर पोलिसांत अपघाताची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धनाजी जाधव, हरिष आव्हाड तपास करीत आहेत.