औट घटकेचा राजा : शिराळशेठ
...................
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 0000-00-00 00:00:00
श्रावणाची सुरुवात झाली की शाहूपुरी, गंगावेस, बापट कॅम्प या भागांतील कुंभार समाजातील माता-भगिनी डोक्यावर बुट्टी घेऊन कोल्हापुरातील प्रत्येक गल्लीत जाऊन 'नागुबं घ्या नागुबं' अशी आरोळी देत नागाच्या मूर्तींची विक्री करतात. जेव्हा या महिलांच्या आरोळीने श्रावणातील दिवसाची सुरुवात व्हायची, तेव्हाच नागपंचमीची आणि शिराळशेठची चिखलाची मूर्ती बनवायची उत्सुकता मनात जागी व्हायची.
आजच्या मुलांना कदाचित शिराळशेठबद्दल माहिती नसेलही कदाचित. पण मी जेव्हा लहान होतो, तेव्हा माझ्या सवंगड्यांसोबत या सणाचा मोठा आनंद घेतला आहे. श्रियाळश्रेष्ठ (अपभ्रंशाने शिराळशेठ) नावाचा एक दानशूर माणूस होऊन गेला, त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा श्रावण शुद्ध षष्ठीचा दिवस श्रियाळ षष्ठी म्हणून साजरा केला जातो.
पैठण येथे इतिहास प्रसिद्ध अनेक गर्भश्रीमंत सावकार होते. त्यातील शिराळशेठ हे एक होते. सन १८३२ मध्ये दक्षिण भारतात तीव्र दुष्काळ पडला होता. अन्न व पाणी यांसाठी जीव गमावण्याची वेळ जनतेवर आली होती. व्यवसायाने सावकार; परंतु मनाने उदार असलेल्या शिराळशेठ यांनी स्वत:जवळ असलेली धान्यांची कोठारे गोरगरिबांना देण्याचा निर्णय घेऊन स्वखर्चाने ते धान्य वितरित केले व लाखो लोकांचा जीव वाचविला.
तत्कालीन राजाने शिराळशेठ यांचे दातृत्व ओळखून त्यांना सत्काराचे निमंत्रण दिले व शिराळशेठ यांनी काहीही मागावे, असे त्यांना सूचित केले. यावर धनदौलत न मागता शिराळशेठ यांनी साडेतीन घटकेसाठी मला राजा करा, अशी विनंती राजाकडे केली व ती मान्य करण्यात आली. तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्ठीचा.
औट घटकेचा राजा होताच शिराळशेठ यांनी गोरगरिबांच्या जमिनी त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला. नाण्याचा शिक्का चामड्यावर मारून त्याचा पैशांच्या रूपात वापर करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच हा श्रावण षष्ठीचा दिवस श्रियाळ षष्ठी म्हणून साजरा केला जातो.
शिराळशेठची प्रतिमा म्हणजे खाऊन पिऊन समाधानी असलेला माणूस. यादिवशी आम्ही सारे सवंगडी शिराळशेठची चिखलाची मूर्ती बनवायचो. त्याची चिखलाची मूर्ती करायची म्हणजे नावाप्रमाणेच ती शेठसारखी दिसली पाहिजे म्हणून आम्ही भरपूर चिखलाचा वापर करायचो. चिखल मिळायचं हक्काचं ठिकाण म्हणजे शाहू स्टेडियम.
पावसाच्या सरींत मित्रांसोबत भिजत जायचं , तिथे चिखल गोळा करण्याअगोदर मनसोक्त चिखलात खेळायचं आणि मग शेवटी बरोबर घेऊन आलेल्या प्लास्टिकच्या पोत्यात तो चिखल भरून घ्यायचा. वरून कोसळणारा पाऊस, चिखल गोळा करताना बरबटलेले हात, मित्रांच्या खोड्या या सगळ्यात प्रत्येकाचा अवतार व्हायचा. मग जुन्या शाहू स्टेडियमच्या वायव्येला असलेल्या बंदिस्त विहिरीत अंगाची स्वच्छता करून घ्यायची.
कारण अशा अवतारात घरी बघितले तर मार ठरलेला. त्यामुळे वर पाऊस पडत असताना अंग आणि कपडे स्वच्छ करायचे. मग अम्यासारखा एखादा कळगुटा मित्र स्वच्छ झालेल्या मित्राच्या अंगाला मुद्दाम चिखलाचे हात लावायचा. त्यातून हाणामारी.. शिव्या या ओघाने यायच्या. पण शिराळशेठची मूर्ती करायची असल्याने या खोड्यांकडे दुर्लक्ष करून आम्ही सगळे घराकडे प्रस्थान करायचो. गल्लीत आलो की, शिराळशेठ करायची जागा ही ठरलेली असायची.
तेलवेकरांचा म्हयशा हा आमचा कॅप्टन असायचा. त्याच्या दारात मोकळी जागा असल्याने आमचा छोट्यांचा गणेशोत्सव, शिवजयंती, हनुमान जयंती आणि शिराळशेठ उत्सव हा त्यांच्याच दारात साजरा व्हायचा. स्टेडियमवरून आणलेला चिखल तिथे ठेवायचा आणि आम्ही सगळे सवंगडी जेवायला आपापल्या घरी निघून जायचो. जेवताना गाडी एकदम सुसाट असायची, कारण आपण काय जेवतोय, किती जेवतोय यापेक्षा शिराळशेठ तयार करायचे वेध लागलेले असायचे.
गडबडीत जेवून एकदा का म्हयशाच्या दारात गेलो की, मग बाकीचे सवंगडीसुद्धा जेवून आलेले असायचे. एक- दीड फुटाच्या दोन काट्या घेऊन त्या पायासाठी वापरायच्या, त्यावर पिंजार लावायचं. नंतर मग मातीचं एक मोठं मडकं पोटाच्या आकारासाठी वापरायचं. तोंड म्हणून दुसरं एक लहानसं मडकं वापरायचं. प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीप्रमाणे हाताशी असेल ते साहित्य वापरून शेवटी मूर्ती तयार व्हायची. मूर्तीला हात, चेहरा, डोळे, भुवया, मिशा, मुकुट अशी सर्व रचना पूर्ण केली जायची. शिराळशेठच्या हातात चिलीम असायची, असा आमच्या लहान मुलांचा समज असल्याने त्यासाठी आम्ही तोंडाला वापरलेल्या मडक्याला एक छिद्र पाडायचो. त्या छिद्रात एक बिडी ठेवायची.
दिवसभरासाठी पुरतील एवढ्या बिड्यांची गरज असल्याने संभाजी बिडीचे एक गोलाकार पाकीट विकत आणायचे. यासाठी प्रत्येकाकडून गोळा केलेले ५-५ पैसे कामाला यायचे. एकेवर्षी तर विचित्र प्रसंग घडला. शिराळशेठची मूर्ती तयार झाली होती. मूर्तीच्या तोंडात विडी शिलगावूनसुद्धा ठेवली होती. पण पाऊस थांबत नसल्याने ती विडी वारंवार विझत होती. मग ती विडी बाहेर काढायची आणि आडोशाला जाऊन काडेपेटीने पेटवून परत मूर्तीच्या तोंडात ठेवायची, असा आमचा प्रयत्न चालू होता. थोडा अवधी जातोयन् जातोय तोवर पावसामुळे परत ती िवडी विझलेली असायची.
यामुळे आम्ही सगळे वैतागलो होतो. शेवटी आमच्यापैकी एकाने एक आयडिया सुचवली, आपण तोंडात धरून विडी पेटवली तर नाही विझणार. ही आयडिया ऐकताच सगळे जण त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले. शेवटी विडी तोंडात धरून पेटवायला कुणीच तयार होईना म्हणून ज्याने सल्ला दिला होता त्यानेच ती विडी घेऊन ओठांच्या मध्ये धरली. काडेपेटी घेऊन काडी ओढली आणि विडीच्या तोंडाजवळ नेली.
विडी पेटली खरी, पण त्यातून धूर येईना. मग त्याने हलकेच श्वास आत घेतला तर त्याला जोराचा ठसका लागला. त्याने तोंडातील विडी काढून टाकली. मग दुसऱ्याने प्रयत्न केला. तोपण अयशस्वी ठरला. मग तिसरा सवंगडी पुढे आला. त्याने विडी तोंडात धरून श्वास आत घेताच तो जोरजोरात खोकायला लागला.
एव्हाना तिघे जण एकसारखे आणि जोरजोरात खोकायला लागले. त्यांचा आवाज ऐकून म्हयशाची आजी ओरडतच बाहेर आली, "अरे पोरांनो, कसला ठसका लागला रे तुम्हाला एकदम?" आजीला बाहेर आलेलं पाहून ज्याच्या हातात विडी होती ती त्याने टाकून दिली. आता शिराळशेठच्या तोंडातून एकसारखा धूर कसा येणार यावर आम्ही शक्कल शोधू लागलो.
शेवटी सर्वांनुमते असं ठरलं की, तोंडाच्या आकारासाठी लावलेलं मडकं मागील बाजूने फोडायचे आणि त्या मडक्याच्या आत नारळाच्या शेंड्या पेटवून ठेवायच्या. ही युक्ती कामाला आली. तोंडातून सलग धूर येऊ लागला आणि शिराळशेठ चिलीम ओढत आहे असंदेखील वाटू लागलं. पण जसजशा शेंड्या पेटून संपायच्या तसतशा नारळाच्या नवीन शेंड्या पेटवून ठेवायचे काम आम्हाला एकसारखे करावे लागले.
विडी पेटवून एकामागोमाग खोकण्याचा प्रसंग आजही आम्हा मित्रांना आठवला की हसू येते. संध्याकाळ झाली की, मग हा शिराळशेठचा उत्सव संपायचा. कुणीतरी वात्रट सवंगडी मग हळूच कुठून तरी फटाके आणून ते मूर्तीजवळ ठेवून पेटवायचा आणि मग उत्सवाची सांगता व्हायची.
लहान असताना शिराळशेठबद्दल फारशी माहिती नव्हती, पण दिवसभर मित्रांसोबत चिखल आणून त्याची मूर्ती बनवण्यात जी मजा असायची ती आज-कालच्या मुलांना नाही कळणार. काळाच्या ओघात श्रियाळ षष्ठीचा विसर पडत चालला आहे.