नाशिकमधून चोरायचा; जळगावात विकायचा

संशयित जेरबंद; अकरा लाखांच्या २७ दुचाकी हस्तगत

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-18 15:20:10

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. दुचाकी चोरट्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषणानुसार जळगाव जिल्ह्यातून अट्टल दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून सुमारे ११ लाखांच्या चोरीतील २७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. 

        किशोर संजय चौधरी (३०, रा. तरवाडे, ता. पारोळा, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. संशयित चौधरी हा नाशिकमध्ये कंपनी कामगार असून, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी उपनगरीय परिसरातील गर्दीची ठिकाणे लक्ष्य करून तो दुचाकी चोरी करायचा. चोरलेल्या दुचाकीवरून तो जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका गाठायचा. तालुका परिसरातील शिवरे, तरवाडे, आडगाव आणि धरणगाव या गावांमध्ये अवघ्या १० ते १५ हजार रुपयांमध्ये तो ती दुचाकी विकायचा. दुचाकीची कागदपत्रे नंतर आणून देतो म्हणून काही रक्कम घेऊन पुन्हा नाशिक गाठायचा. अशा रीतीने त्याने या परिसरात विकलेल्या २७ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी शिताफीने हस्तगत केल्या आहेत. यात पंचवटीतील १०, सातपूरमधील ३, तर एक आडगाव हद्दीतील दुचाकींच्या मालकांची ओळख पटली असून, उर्वरित दुचाकींसंदर्भात गुन्हे व मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, भगवान जाधव यांच्या पथकाने पारोळ्यातून संशयित चौधरी यास शिताफीने अटक केली आहे.

चोरीची पद्धत एकसारखीच 

दुचाकी चोरीची 'मोडस् ऑपरेंडी' एकसारखीच असल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निदर्शनास आल्यानंतर पथकाने संशयिताचा शोध सुरू केला. यात १४ गुन्ह्यांची उकल करीत संशयित चौधरी याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या ११ लाख १७ हजारांच्या २७ दुचाकी जप्त केल्या. यांपैकी १४ दुचाकींच्या मालकांचा शोध लागला, तर उर्वरित १३ वाहनमालकांचा व दाखल गुन्ह्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, उघड झालेले नऊ गुन्हे हे १ जुलै २०२४ पूर्वी दाखल असून, जप्त वाहनांत पॅशन प्रो, प्लस आणि हिरो होंडा या दुचाकींचा समावेश आहे.