एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

कारण अद्याप अस्पष्ट

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-18 17:30:49

 लोकनामा प्रतिनिधी

 नाशिक :-  इंदिरानगर परिसरातील सराफ लॉन्स भागात राहणाऱ्या पत्नी-पत्नीने त्यांच्या नऊवर्षीय मुलीसह आत्महत्या केली. विजय माणिकराव सहाणे (वय ४०), ज्ञानेश्वरी विजय सहाणे (३६) व अनन्या (वय ९ वर्षे), अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. 

     विजय सहाणे एका कंपनीत कामाला होते. काही दिवसांपासून त्यांची कंपनी बंद झाल्याचे सांगण्यात येते. बुधवारी (दि. १८) सकाळी विजय सहाणे यांचे वडील माणिक सहाणे सकाळी आठच्या सुमारास आपली नात अनन्या शाळेत जाण्यासाठी खाली आली नाही म्हणून चौकशीसाठी वरच्या मजल्यावर गेले. मात्र, दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बराच वेळ दार ठोठावून बघितले. काहीही उत्तर मिळत नसल्याने त्यांनी शेजारच्या लोकांना बोलावले. त्यानंतर दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता विजय, ज्ञानेश्वरी व अनन्या मृतावस्थेत आढळले.

      यानंतर इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. या तिघांजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. तिघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.