सव्वाचार लाखाच्या रोकडवर भामट्यांचा डल्ला
बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या कामगारास मारहाण
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-20 12:19:56
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : गणेशवाडी भागात बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या कामगारास मारहाण करत दोघांनी रोकडसह दुचाकी पळविल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे सव्वाचार लाखाच्या रोकडवर भामट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरान खान मुदसर खान (वय १९, रा. पंचशीलनगर) व रशीद नामक युवक, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित लुटारूंची नावे आहेत. याप्रकरणी संजय बाबुलाल सोळंकी (रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) यांनी फिर्याद दिली. सोळंकी नानावलीतील जहाँगीर मंगल कार्यालय परिसरात असलेल्या प्रशांत मार्केटिंग अॅण्ड डिस्ट्रिब्यूटर्स या एजन्सीत काम करतात.
ते बुधवारी (दि. १८) नेहमीप्रमाणे कामावर गेले असता, मालक प्रफुल्ल जैन यांनी त्यांना जमा झालेली रोकड शरणपूर रोडवरील डीबीएस बँकेत भरणा करण्यासाठी पाठविले. त्यावेळी ही घटना घडली. सोळंकी चार लाख १७ हजारांची रोकड घेऊन दुचाकीने बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना ही लूटमार झाली.
गणेशवाडी येथील सुलभ शौचालय परिसरातून ते अॅक्टिव्हावरून (एमएच १५- सीएफ १२१४) जात असताना भामट्यांनी त्यांची वाट अडवली. यावेळी दुकलीने जीवे मारण्याची धमकी देत सोळंकी यांना मारहाण केली. या घटनेत भामट्यांनी सोळंकी यांच्या ताब्यातील रोकड व दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर तपास करत आहेत.