शस्त्रक्रिया, स्त्रीरोग शाखेला वळसा का?
...............
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 0000-00-00 00:00:00
समाजातील बुद्धिवान विद्यार्थ्यांचा सर्वांत वरचा स्तर हा वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरतो. त्यातही एमबीबीएस व पदव्युत्तर जागांमध्ये एवढी तफावत आहे की, पदव्युत्तर प्रवेश परीक्षा ही जवळपास यूपीएससी परीक्षेएवढीच तीव्र स्पर्धेची असते. एकेकाळी या तीव्र स्पर्धेत यशस्वी होऊन विद्यार्थी बालरोग, जनरल सर्जरी, स्त्रीरोग या वैद्यकीय शाखांना प्रथम प्राधान्य देत होते.
कारण विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीच्या या शाखा होत्या. आता तसे दिसत नाही. देशातील पहिले शंभर एमबीबीएस विद्यार्थी पदव्युत्तर शाखेची निवड करताना रेडिओलाॅजी, डरमॅटाॅलाॅजी तथा त्वचारोग, जनरल मेडिसीन या शाखांना प्रथम पसंती देताना आढळत आहेत.
बालरोग, जनरल सर्जरी व स्त्रीरोग या शाखांकडे अनुक्रमे एक, चार व दोन टक्के याप्रमाणे केवळ सात टक्के विद्यार्थी पसंती दर्शविताना आढळत आहेत. विद्यार्थ्यांना या शाखा नकोशा वाटण्यामागे केवळ विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेतील बदल हे एकमेव कारण नसून, त्यामागे सामाजिक बदलाचे संकेत निदर्शनास येतात. शाखा स्वीकारणे व नाकारण्याला वैद्यकीय क्षेत्रातील काही बदल व रुग्ण-डाॅक्टर संबंधातील स्थित्यंतरेही जबाबदार असल्याचे आढळले आहे.
सन १९९५ मध्ये वैद्यकीय क्षेत्र ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आले. त्यानंतर अनेक छोट्या-मोठ्या कारणांसाठी रुग्ण डाॅक्टरांना कोर्टात खेचू लागले. परिणामी, शस्त्रक्रिया व स्त्रीरोग या शाखा दिवसेंदिवस कायदेशीरदृष्ट्या जोखमीच्या झाल्या आहेत. यात प्रसिद्धी व पैसे तसे पाहायला गेल्यास इतर शाखांपेक्षा जास्त आहेत.
एकही छोटीशी चूक किंवा अतिरक्तस्रावामुळे माता मृत्यूची एक केस तुमचे संपूर्ण आयुष्य व करिअर बेचिराख करू शकते. त्यातच आता डाॅक्टरांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शस्त्रक्रियेत अनिश्चितता जास्त असल्याने हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णासोबत स्वतःचा जीव वाचवणे हेही डाॅक्टरांना गरजेचे वाटू लागले आहे. त्यामुळे जास्त जोखमीच्या शस्त्रक्रिया निगडित शाखा नकोच, असा विचार जोर धरत आहे.
या सगळ्या ट्रेंड्समध्ये बालरोग शाखेकडे न वळण्याचे कारण म्हणजे लसीकरणाच्या अभावामुळे ग्रामीण भागात बालरोग क्षेत्रातील समस्या वाढल्या आहेत व बालमृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. याचे दुसरे एक मोठे कारण म्हणजे, आरोग्य विभागात व शासकीय सेवेत बालरोगतज्ज्ञांच्या जागा रिक्त आहेत.
चांगला मोबदला देऊन ती रिक्तपदे भरण्याची नितांत गरज आहे, पण शासन त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करताना आढळत आहे. ग्रामीण भागात हीच समस्या स्त्रीरोगतज्ज्ञांच्या बाबतीत आहे. कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीचे मापन हे दरडोई उत्पन्न नसते, तर त्या राष्ट्राचा मातामृत्यू व बालमृत्युदर असते.
याच शाखांकडे उपरोल्लेखित वास्तववादी कारणास्तव डाॅक्टर वळत नसतील, तर सर्व दोष डाॅक्टरांवर न ढकलता यावर सामाजिक संशोधन होणे गरजेचे आहे. शस्त्रक्रियेसारख्या शाखेत सराव व सुपर स्पेशलायझेशन करणे आवश्यक असते. एवढे संपून वयाच्या ३५ व्या वर्षी प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी भांडवल अवाढव्य असते.
त्यामुळे प्रचंड अंगमेहनतीच्या या शाखांमध्ये अर्धेअधिक आयुष्य शिक्षणात खर्च होऊन हाती काय लागेल हा प्रश्न भेडसावत असतानाच सोबत अनिश्चितताही आहे. हाही एक विचार शाखा नाकारण्यामागे आहे असे नाही. कारण ३५ टक्के विद्यार्थी हे मेडिसीन शाखा निवडत आहेत. ज्यासाठी मेहनत व इमर्जन्सी असतेच.
पहिली पसंती असलेल्या रेडिओलाॅजी शाखेमध्ये मात्र काही प्रमाणात रुग्णांशी कमीत कमी संवाद व ठरवलेल्या वेळेत काम संपवून घरी जाण्याची मुभा आहे. पण या शाखेत अंगमेहनत नसली तरी मेंदूची कसरत इतर सर्व शाखांच्या तुलनेत अधिक आहे, जी कुठल्याही टाॅपर विद्यार्थ्याला जास्त सोपी वाटते.
आपल्या सोबतचे इतर शाखांतील टाॅपर विद्यार्थी हे कौशल्याच्या जोरावर तिशीआधी परदेशात बंगले विकत घेताना व सुखासीन आयुष्य जगत असताना पाहून आपण किमान त्या तुलनेत सुखासीन नसले, तरी आयुष्य सुकर करणारे पर्याय का निवडू नयेत? हा विचार वैद्यकीय क्षेत्रात पहिल्या ५० विद्यार्थ्यांच्या मनात येणे साहजिक आहे.
भारत हा असंसर्गजन्य आजार म्हणजे ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणाची जागतिक राजधानी बनत चालला आहे.
देशातील दर चौथ्या व्यक्तीला यांपैकी एक आजार जडला आहे. या आजारांच्या उपचारासाठी साधा बाह्यरुग्ण विभाग पुरेसा असतो. तसेच सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे अतिदक्षता विभागात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ही खूप वाढले आहे. यामुळे जनरल मेडिसीन शाखेला प्रचंड मागणी आहे.
रुग्णालयातील सर्व शाखा या मेडिसीन शाखेभोवती फिरतात. म्हणून या शाखेला विद्यार्थ्यांची पसंती असणे हे नैसर्गिक व गरजेचे आहे. रेडिओलाॅजिस्ट ही शाखा कायदेशीर संरक्षणापलीकडे लवकर निदान होऊन योग्य उपचार देण्यास उपयुक्त ठरली आहे. त्वचारोग व त्यातच कॉस्मेटाॅलाॅजी म्हणजे सौंदर्यशास्र ही शाखा गेल्या दोन दशकांत आर्थिकदृष्ट्या सर्वांत समृद्ध शाखा झाली आहे. लेझर तंत्रज्ञानातील मोठ्या बदलामुळे आज कॉस्मेटाॅलाॅजिस्टसाठी या लेझर मशिन्स कामधेनु व कल्पवृक्षाचे काम करत आहेत.
शाखा निवडीचे पर्याय दर ३० वर्षांनी बदलत असतात.
कारण दर तीन दशकांनी समाजातही वैचारिक स्थित्यंतर घडत असते. शेवटी वैद्यकीय विद्यार्थी याच समाजातून आले आहेत व पुढे काय घडणार याचा अंदाज बांधून विद्यार्थी हा निर्णय घेतात. ग्रामीण, शहरी विकासाची दरी व समाजात बुद्धिवंतांना मिळणारी वागणूक याचा शाखा निवडीशी थेट संबंध आहे. यश तुम्हाला बरेच काही देते, पण त्याची पुरेपूर किंमत वसूल करते, असे म्हटले जाते.
कदाचित याचा ताळेबंद वैद्यकीय विद्यार्थीही बांधत असावेत. एका बौद्धिक वर्गाने सामाजिक समस्या समोर ठेवून त्याग करावा व आपल्या करिअरचे निर्णय घ्यावेत हा विचार आजच्या काळासाठी अतिआदर्शवादी आहे. आजची पिढी त्यागाच्या रोमँटिसिझममध्ये जगून करिअरचे भावनिक निर्णय घेणारी नाही.
त्याग करायचा असेल, तर सोपा व मोबदला देणारा वाटावा, असे बदल समाज व धोरण आखणाऱ्यांना करावे लागतील. आता होणारे बदल त्याचेच निदर्शक आहेत. देशातील तरुण काय विचार करतोय व कोणाला आदर्श म्हणून पाहतोय हे मला सांगा व त्यावरून मी त्या देशाचे भवितव्य सांगतो, असे उद््गार लेखक व तत्त्ववेत्ते इडेवू कोयिनिकाल यांनी काढले आहेत.
तद्अनुषंगाने अभ्यासाअंती सद्य:स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील वैद्यकीय विद्यार्थी काय विचार करतोय, हे पाहणे व त्यावरून वैद्यकीय क्षेत्राचे भवितव्य काय असेल हा अंदाज बांधणे सहज शक्य होऊ शकेल हे मात्र तितकेच खरे!
- अरुण दीक्षित