साडेचार लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
मंगरूळ फाट्यावर चांदवड पोलिसांची कारवाई;
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-23 19:04:45
लोकनामा प्रतिनिधी रेडगाव खुर्द ः पिकअपमधून विदेशी मद्याची बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना आढळल्याने चांदवड पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील मंगरूळ फाट्यावर कारवाई केली. यात चार लाख ६६ हजार ८० रुपयांचा विदेशी मद्यसाठा व सहा लाखांची टाटा इन्ट्रा पिकअप, असा एकूण दहा लाख ६६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विदेशी मद्याची बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून चांदवड पोलिसांनी रविवारी (दि. २२) दुपारी पावणेदोनच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील मंगरूळ फाट्यावर कारवाई केली. यात एक लाख २२ हजार ४०० रुपयांचे रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रिमियम व्हिस्की कंपनीचे ३० खोके, ५० हजार ४०० रुपयांचे रॉयल स्पेशल्स प्रिमियम व्हिस्की कंपनीचे २१ खोके, ३६ हजारांचे डीएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्की कंपनीचे १० खोके, दोन लाख ५७ हजार २८० रुपयांचे इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की कंपनीचे ६७ खोके व सहा लाखांची टाटा इन्ट्रा पिकअप (एमएच १५-जेसी ०५८३), असा एकूण दहा लाख ६६ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमजद झुल्फीकार सय्यद (वय ३६, रा. नवापूर, जि. नंदुरबार) व ललितकुमार रामूभाई सुमन (३८, रा. उदवाडा, जि. वलसाड, गुजरात) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक कैलास वाघ, उपनिरीक्षक भाऊसाहेब नर्हे, पोलीस नाईक सुनील जाधव, स्वप्नील रंधे, विक्रम बस्ते, संतोष लोखंडे, दिनेश सूळ या पथकाने केली. पोलीस नाईक सुनील जाधव तपास करत आहेत.