लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिला घेणार घटस्फोट
करिअरवर करायचेय फोकस
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-09-26 17:11:59
मुंबई :- पिंजर, रंगीला, खुबसूरत, कौन, जंगल, वाघोबासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करुन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ऊर्मिला मातोंडकरने लग्न करताना देखील वेगळी वाट स्वीकारली होती. आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असलेल्या, मुस्लिम युवक मोहसिन अख्तर मीर याच्याशी २०१६ मध्ये तिने लगीनगाठ बांधली होती. मात्र तिच्या या आंतरधर्मीय लग्नावर अनेकांनी टीका केली होती. मात्र आपले करिअर, धर्म, वय, लोकांची टीका या सगळ्या बाबी बाजूला सारत उर्मिलाने लग्न केले होते. गेली ८ वर्षे दोघांचे नाते एकदम छान उमलले, फुलल्यासारखे दिसत होते. वेळोवेळी उर्मिलाकडून पोस्ट होत गेलेल्या मेसेजेसमधून ते दिसतही होते. आता मात्र या दोघांच्या नात्यात विघ्न आले आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून ऊर्मिलाने चार महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज सादर केला आहे.
हा घटस्फोट परस्परांच्या सहमतीने होत नाहीये, हे लक्ष वेधून घेण्यासारखे आहे. मासूम या सिनेमातून बाल कलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर उर्मिलाने नेहमीच सकस भूमिकांन प्राधान्य दिले. उर्मिलाच्या कुटुंबात वैचारिक भूमिका लाभलेले सदस्य आहेत. त्यामुळे तिची जडणघडण देखील तितक्याच प्रगल्भतेने झालीय. तर उर्मिलाचा पती मोहसिन हा कश्मीरचा व्यावसायिक आहे. ताे मुंबईत अभिनय करण्यासाठी आला होता. काही चित्रपट केल्यानंतर ते अपयशी ठरल्यामुळे त्याने कापड व्यवसाय करायचे ठरवले. यानिमित्त फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या संपर्कात आला. मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात त्याची आणि उर्मिलाची ओळख झाली होती. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं आणि नंतर लग्न केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार उर्मिलाला तिच्या करिअरवर पुन्हा फोकस करण्याची इच्छा आहे. दोघांमधील बेबनावाचे हे एक कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.