डॉक्टरने महिलेची पित्तनलिकाच कापली

शस्त्रक्रियेत अक्षम्य चूक

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-26 18:22:27

 लोकनामा प्रतिनिधी 

नाशिक : पित्ताशयातील खड्यांच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरने महिलेची पित्तनलिकाच कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चुकीच्या शस्त्रक्रियेच्या मोबदल्यात ११ लाखांची नुकसानभरपाई देण्याची ग्वाही देऊन टाळाटाळ  केल्याने परप्रांतीय महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संतोष रावलानी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे. याबाबत सौम्या शशिधरण नायर (वय ३०, मूळ रा. विशाखापट्टणम, ह. मु. थेटे अपार्ट. उपनगर) यांनी फिर्याद दिली. नायर यांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास होत होता. त्यामुळे त्या पौर्णिमा स्टॉप परिसरातील संशयिताच्या संतोष मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड डे केअर हॉस्पिटल येथे दाखल झाल्या होत्या. २३ ऑगस्टला पित्ताशयातील खड्यांची शस्त्रकिया झाली. याप्रसंगी निष्काळजीपणामुळे त्यांची पित्तनलिकाच कापण्यात आली. रक्तवाहिनीला छेडछाड करण्यात आल्याने त्यांच्या पित्तनलिकेस दुखापत झाल्याने त्यांना शहरातील सुयश हॉस्पिटल व नंतर पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. उपचारानंतर नायर यांनी डॉ. रावलानी यांना गाठून जाब विचारला असता, संशयिताने चुकीची कबुली देत ११ लाखांची नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर पैशांचा तगादा लावत नायर व त्यांचे वडील शशिधरण नायर यांनी पुन्हा डॉ. रावलानी यांची भेट घेतली असता, संतप्त डॉक्टरने शशिधरण नायर यांच्या अंगावर धावून जात पैसे देण्यास नकार दिला. पोलीस उपनिरीक्षक तोंडे तपास करत आहेत.