मालेगावला सूतमालात ३.७३ कोटींची फसवणूक
तिघांविरुद्ध तक्रार दाखल
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-26 19:00:45
लोकनामा प्रतिनिधी
मालेगाव : येथील इस्लामपुरा भागातील तिघांनी अंधेरीच्या एका सूत व्यापाऱ्याची तीन कोटी ७३ लाख २६ हजार २३१ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी मूळच्या राजस्थानातील पाली येथील मयंक विनोद दोशी (रा. अंधेरी पूर्व) यांनी रॉयल किंग टेक्सचे प्रोप्रायटर जियाउर रेहमान अब्दुल रहमान व मेहमुद रहेमानी (दोघे रा. इस्लामपुरा, मालेगाव) तसेच आरआरआर टेक्सचे प्रोप्रा. रियाजुर रहेमान अब्दुल रहेमान (रा. इस्लामपुरा, मालेगाव) या तिघांविरुद्ध शहर पोलिसांत दोन वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहेत.
ही घटना १६ नोव्हेंबर २०२३ ते २० एप्रिल २०२४ या दरम्यान सूत व्यापारात घडली. दोशी यांनी त्यांच्या एसीई ग्लोबल कंपनीतर्फे संशयित आरआरआर टेक्सचे प्रोप्रा. रियाजुर यांना ८८ वेळा १६ कोटी २३ लाख ८६ हजार ३९६ रुपयांचा सूतमाल दिला होता. त्यातील संशयित रियाजुर यांनी फिर्यादीला बँकेद्वारे १३ कोटी ९० लाख ३३८ रुपये अदा केले. मात्र, उर्वरित दोन कोटी ३३ लाख ८६ हजार ५८ रुपये दिले नाहीत. असाच प्रकार संशयित रॉयल किंग टेक्सचे प्रोप्रा. जियाउर रेहमान व मेहमुद रहेमानी यांनी केला आहे. त्यांच्या रॉयल किंग टेक्स कंपनीला नऊ कोटी १९ लाख २७ हजार १२० रुपयांचा सूतमाल दिला. त्यावर दोघा संशयितांनी फिर्यादीला बँकेद्वारे सात कोटी ७९ लाख ८६ हजार ९४७ रुपयांची परतफेड केली. मात्र, एक कोटी ३९ लाख ४० हजार १७३ रुपयांची थकबाकी दिली नाही. तिघा संशयितांनी दोन्ही फसवणुकीत या व्यवहाराचे जीएसटी इनपुट (ITC Credit) सरकारकडून प्राप्त करून घेतल्यानंतरही संशयित रियाजुर, जियाउर व मेहमुद यांनी हा सूतमाल मिळाला नाही, अशी खोटी भूमिका घेतली. पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे, थोरात तपास करत आहेत.