प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

विद्यानगरी पुण्यातील संतापजनक घटना

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-27 14:05:31

पुणे : बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे पोलिस एन्काऊंटर करण्यात आले. यापूर्वी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचेही एन्काउंटर करण्यात आले होते. निर्भयाचे आरोपी फासावर लटकवण्यात आले.  यामुळे असे अमानवी कृत्य करणाऱ्या नरामधमांना जरब बसेल, धाक निर्माण होईल, अशी आशा होती. मात्र ही आशा फोल ठरताना दिसत आहे. कारण बदलापूर एन्काऊंटर होऊन आठ दिवस होत नाहीत तोच पुण्यातील एका प्राध्यापकाच्या, महाविद्यालयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.  

या घटनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे  महाविद्यालयात पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ जागृती उपक्रमात हा प्रकार समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी एका महाविद्यालयात 'गुड टच, बॅड टच' संदर्भातील कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी एक तरुणी तणावाखाली होती. ती महाविद्यालयीत समुपदेशकाकडे गेली होती. स्वत:बद्दलची माहिती देत असतानाच तिने समुपदेशकाला स्वत:च्या मैत्रिणीबाबत देखील सांगितले. ती मुलगी सतत तणावाखाली असते. तसेच, तिच्याबाबत काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय तिने व्यक्त केला. तिला अनेक मुलांचे फोन येत असल्याचेही तिने सांगितले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून समुपदेशकाने पिडित मुलीला तिच्या आई-वडिलांसह महाविद्यालयात बोलवून चर्चा केली. त्यावेळी पिडीत मुलीने तिने घडलेला सर्व प्रकार कथन केला. तिची ‘इंन्टाग्राम’वर वेगवेगळ्या चार मुलांशी ओळख झाली होती. त्यातून या मुलांनी गोड बोलून तिच्याशी वेळोवेळी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीच्या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला.  समुपदेशकाने ही माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्तांना कळवली. विश्वस्तांनी ही माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना कळवली. त्यानंतर पिडीत मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

  याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ओम आदेश घोलप (वय २०) आणि स्वप्निल विकास देवकर (वय २२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तर, अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. त्यांची बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे.  

दरम्यान, राज्याची सांस्कृतिक, साहित्यिक राजधानी म्हणूनही पुण्याचा लौकिक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुण्याच्या सुसंस्कृतपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात दाखल होणाऱ्या युवक-यवुतींचे प्रमाण वाढले आहे. परिवारापासून दूर राहणारी ही तरुणाई बेफाम होऊन गुन्हेगारीकडे वळताना दिसू लागली आहे.