एकनाथ शिंदेसाठी बनवलाय ‘ धर्मवीर -२ ’ ?

पहिल्या दिवशी दीड कोटीचा गल्ला

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-09-28 13:55:38

मुंबई : शिवसेनेचे  माजी ठाणे जिल्हाप्रमुख स्व.आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत, राजकारणात चांगलीच धूम केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर बनवण्यात आलेला धर्मवीर -२ हा सिक्वेल शुक्रवारी (दि.२७ सप्टेंबर ) रोजी रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाची मोहिनी मराठी प्रेक्षकांवर पहायला मिळाली. चित्रपटाची सुरुवात  दमदार  झाली आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने  तब्बल १.६५ कोटींची कमाई केली आहे.

ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रिलीज झालेल्या या चित्रपटामुळे राज्याच्या  राजकारणाला नवे वळण मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण या चित्रपटात ॲक्शन,रिॲक्शनचा भडीमार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जास्त फोकस करण्यात आला आहे. हिंदूत्व, महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे यांच्याभोवती सिनेमा फिरता ठेवण्यात आला आहे. हिंदूत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी कॅचलाईन देऊन थेट शिवसेना ठाकरे गटाला टार्गेट केले जात असल्याचे ठळक दिसून येत आहे.  तसेच खास एकनाथ शिंदे यांच्यासाठी सिनेमा तयार करण्यात आला की काय? अशी शंका उपस्थित करण्यासाठी देखील वाव निर्माण झाला आहे.   येत्या काही दिवसांत सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

'धर्मवीर २' हा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित झाला आहे. आनंद दिघे यांच्या प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक आहेत.क्षितीश दाते यांनी एकनाथ शिंदे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. मंगेश देसाई, अभिजित खांडकेकर, सुनील तायडे, आनंद इंगळे यांच्याही भूमिका सिनेमात आहेत. पटकथा प्रवीण तरडे यांची असून  त्यांनीच दिग्दर्शन केले आहे.