स्वत:ची इमेज बिल्डअप करण्यासाठी चित्रपट
केदार दिघेंची एकनाथ शिंदेंवर खडसून टीका
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-09-28 17:36:34
मुंबई : काही चित्रपट बनण्यापूर्वी आणि रिलीजनंतरही सतत वादाच्या भोवऱ्यात अडकतात. काल ( दि.२७ ) रिलीज झालेला धर्मवीर-२ हा देखील असाच चित्रपट ठरला आहे. कारण राज्याच्या राजकारणालाच कलाटणी देणारा चित्रपट तसेच चित्रपटाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न म्हणून या चित्रपटावर आता चांगलीच टीकेची तोफ डागली जात आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनीच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
धर्मवीर-२ मध्ये आपली इमेज सांभाळण्यासाठी हा चित्रपट बनवला गेलाय. धर्मवीरमध्ये काही क्षण योग्य होते, मात्र धर्मवीर -2 मध्ये आपली गद्दारी कशी लपवावी आणि चांगली इमेज कशी दाखवावी, याचा केविलवाणा प्रयत्न केला गेल्याची टीका केदार दिघे यांनी केली आहे.
स्वतः ची इमेज बिल्डअप करण्यासाठी, प्रपोगंडा करण्यासाठी आणि फेक नॅरेटिवेह सेट करण्यासाठी बनवलेला हा चित्रपट आहे. दिघे साहेबांचे संबंध हे वैयक्तिक होते, पक्षाच्या पलीकडचे देखील होते. त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाचं काम कर्तव्य म्हणून ते करत होते. दिघे साहेब समजायचे असेल आणि धर्मवीर बनवायचा असेल तर दरी खोऱ्यातील अनुभव वाचायला हवे.
दिघे साहेबांचे नाव घ्यायचे आणि धर्मवीर नाव लावायचे आणि स्वत:चा प्रचार करताना खोट्या गोष्टी दाखवायच्या, आनंद आश्रमाला स्वत:चे नाव लावले, दहिहंडीसाठी स्वत:चे फोटो लावले, हे कधीही दिघे साहेबांनी केले नव्हते. निवडणूका आहेत म्हणून त्यासाठी तुम्ही दिघे साहेबांच्या नावाचे राजकारण करत आहात, हे बरोबर नाही.
दुसरीकडे राजकीय वर्तुळात धर्मवीर -२ या चित्रपटावर, प्रवीण तरडेंवर टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मतांसाठी, निवडणूकीसाठी थुकरट युती प्रवीण तरडेंनी दाखवली आहे, असे ट्विट अंधारे यांनी केले आहे.