मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार

८ ऑक्टोबर ला होणार वितरण

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-09-30 14:53:36

बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून अशी ओळख असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा समजला जाणारा यंदाचा ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.   केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.        

ज्येष्ठ अभिनेते मिथुन दा यांना त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटसृष्टीतील प्रवास व भारतीय चित्रपटसृष्टीतील अप्रतिम योगदानाबद्दल या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.    मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदी, बंगाली, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांसह विविध भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहत्यांमध्ये ते ‘ मिथुनदा ’ या नावाने लोकप्रिय आहेत. 

 ‘डिस्को डान्सर’ने दिली ओळख

१९८२ मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती सुपरस्टार झाले. या चित्रपटाने परदेशातही उत्कृष्ट व्यवसाय केला . त्यानंतर मिथुन दा यांनी ‘तेरे प्यार में, ‘प्रेम विवाह, ‘हम पांच, ‘डिस्को डान्सर, ‘हम से है जमाना, घर एक मंदिर,गुरु, गोलमाल-३, ओह माय गॉड, अग्निपथसह अनेक चित्रपटात दमदार अभिनय केला.१९७६ मध्ये आलेल्या ‘मृगया’ चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. 

पुरस्कार कुटुंबाला आणि चाहत्यांना समर्पित   

"माझ्याकडे शब्द नाहीत, मला हसता आणि रडता येत नाही. कोलकात्याच्या एका गल्लीतून मी जिथून आलो आहे, तिथल्या फूटपाथवरील मुलाला एवढा मोठा सन्मान मिळेल, याची मी कल्पनाही केली नव्हती.’मी एवढंच सांगेन की, हा सन्मान मी माझ्या कुटुंबाला आणि सर्व चाहत्यांना समर्पित करणार आहे." अशा शब्दात मिथुन यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.