चिमूरडीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा

चॉकलेटचे दाखवले होते आमिष; नंतर केली हत्या

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-30 17:23:44

कर्नाटक :कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिला पुरणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.  बेळगावी विशेष जलदगती न्यायालयाने हारुगेरी येथील कुरुबगोडी गावातील रहिवासी उद्दप्पा रामाप्पा गांगर याला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच, त्याला ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा २१ सप्टेंबर २०१७ रोजी घडला होता. 

 उद्दप्पाने तीन वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. नंतर त्याने मुलीच्या तोंडात माती टाकून तिची हत्या केली. त्याने तिचा मृतदेह डोक्यापासून पोटापर्यंत पुरला होता,[अशी माहिती पोलिसांनी दिली.  पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली उद्दप्पाला अटक करण्यात आली. न्यायमूर्ती सीएम पुष्पलथ यांनी वैद्यकीय अहवालांसह २५ पुरावे तपासले. त्यांनी उद्दप्पाला दोषी ठरवले आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मुलीच्या कुटुंबाला ३ लाख रुपयांची भरपाई देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, बालकांचे लैंगिक शोषण हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. नुकतेच बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रमुख आरोपीचे  एन्काऊंटर करण्यात आले. महिला, युवती, लहान मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढतेच आहे. भविष्यात जलद गतीने खटला चालवणे, तसेच स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्दयावर काम करण्यासाठी अजूनही खूप वाव आहे.