टोळक्याकडून एकावर कोयत्याने हल्ला

नाशकात ऐन नवरात्रात दहशत

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-10-04 12:45:18

लोकनामा प्रतिनिधी 
सातपूर : येथील श्रमिकनगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका तरुणाला कोयता व हॉकी स्टीकच्या साहाय्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ऐन घटस्थापनेच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना कोयता गँगने दहशत पसरवत नागरिकांना भयभीत करून सातपूर पोलिसांना आव्हान दिले आहे.        याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार, ३ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगरमधील धात्रक चौकामध्ये ॲक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षा मधील आठ जणांच्या गँगने हल्ला केला. ॲक्टिवावरील दोन जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले. परंतु अतुल खरे (रा. हिंदी शाळा, श्रमिकनगर) या तरुणास आठजणांनी सिनेस्टाईल हॉकी स्टीक, स्टम्प व कोयत्याने डोके, पाठ व पायावर जबरी वार केले. वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळे कोणीही मध्ये पडण्याची हिंमत केली नाही. सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खासगी दवाखान्यात नेले. परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सातपूर पोलीस ठाण्यात सुरू होते. श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, अशोकनगर, गंगासागरनगर परिसरांत अशा घटना नेहमीच होत असल्याने नागरिकांनी सातपूर पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.