दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने लाखोंना गंडा
दोघा संशयितांविरोधात लासलगाव पोलिसांत गुन्हा
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-10-07 13:10:13
लोकनामा प्रतिनिधी
लासलगाव : चाळीस दिवसांत दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने लासलगावकरांना २०० कोटींचा, तर मुंबई, कोलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद या ठिकाणांहून जवळपास हजार कोटींचा गंडा घालून कंपनीचालक फरारी झाला आहे.
सोमनाथ गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून सतीश पोपटराव काळे, योगेश परशुराम काळे (दोघेही रा. टाकळी विंचूर, ता. निफाड)) यांच्याविरुद्ध ५० लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासांतर्गत फसवणुकीचा आकडा आणि व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
कंपनीचे सर्वेसर्वा सतीश काळे आणि संचालक योगेश काळे हे दोघे फरारी असून, त्यांचा लासलगाव पोलिसांकडून शोध सुरू आहे. तीन लाखाच्या गुंतवणुकीवर ४० दिवसांत पैसे दुप्पट, वर एक दुचाकी बक्षीस, तर दहा लाखांच्या गुंतवणुकीवर ४० दिवसांत पैसे दुप्पट, वर चक्क चारचाकी बक्षीस अशा भन्नाट युक्त्या वापरताना नागरिकांना आमिष दाखवत कंपनीचे संचालकानी दलालांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमवत कंपनीचालक रफूचक्कर झाले. यामध्ये अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी स्वतःचे सोने गहाण ठेवून, मोडून, स्वतःच्या घरावर कर्ज काढले, तर काहींनी नातेवाइकांकडून पैसे आणून योजनेच्या माध्यमातून कंपनीमध्ये पैसे गुंतवले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय होऊन १० टक्के कमिशन घेत सर्वसामान्य नागरिकांना दामदुप्पटचे आमिष दाखवून रक्कम गुंतवण्यास भाग पाडले.
यातील काही महाभाग दलालांनी तर स्वतःचे धनादेश ही गुंतवणूकदारांना दिल्याची माहिती आहे. एकंदरीतच कंपनीचे कर्तेधर्तेच पसार झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांचे पैसे मिळणे अवघड झाल्याने गुंतवणूकदारांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.