धावत्या रेल्वेमध्ये युवतीवर अत्याचार
पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-10-08 14:43:48
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : भुसावळ ते सुरतदरम्यान धावत्या रेल्वेच्या शौचालयात अज्ञात तरुणाने युवतीवर अत्याचार केला. मात्र ही घटना पाच महिन्यांनंतर उघडकीस आली असून, याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी भुसावळ रेल्वे पोलिसांकडे गुन्हा नोंदविला आहे. मात्र, यावेळी संबंधित युवती व पालक भुसावळहून सुरतकडे जात असल्याने भुसावळ रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा नाशिकला गंगापूर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित युवतीचे पालक मुलीसह नाशिकहून सुरत येथे जाण्यासाठी प्रथम भुसावळला एसटी बसने गेले व भुसावळ ते सुरत हा प्रवास रेल्वेने केला. रेल्वे सुरू होत नाही, तोच सुमारे दहा मिनिटांनी ही युवती शौचालयात गेली असता, अज्ञात युवकाने शौचालयात घुसून या युवतीवर अत्याचार केला. यातून संबंधित युवती गर्भवती राहिली; मात्र त्यावेळी तिला ते समजून आले नव्हते.
दरम्यान, गेल्या ऑगस्टमध्ये हे कुटुंब पुन्हा सुरत येथे जात असताना या युवतीच्या पोटात त्रास सुरू झाला. त्यामुळे तिला सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय सूत्रांनी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. याबाबत तिच्या पालकांनी युवतीला जाब विचारला. यावेळी पीडितेने गेल्या एप्रिलमध्ये घडलेली आपबिती सांगितली. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदविला असून, तो आता तपासासाठी नाशिकला गंगापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुमडे व सहकारी पुढील तपास करीत आहेत.