टीम वाळवीने केली सर्वोच्च सन्मानाची अवहेलना

पुरस्कार समारंभास अनुपस्थिती; अनेकांची टीका

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-09 18:05:36

नवी दिल्ली :  भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात महत्वाचा, मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणे  ही प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाची, गौरवास्पद बाब असते. देशभरातील विविध भाषांमधील चित्रपटांमधून सर्व पुरस्कार निवडले जात असतात. त्यामुळे महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना कृतार्थ भावना कलाकाराच्या मनात असते, यंदा हे भाग्य मराठी चित्रपट ‘ वाळवी’ च्या निमित्ताने दिग्दर्शक परेश मोकाशी व टीम वाळवीला लाभले होते. मात्र देशाच्या सर्वोच्च सन्मानाची अवहेलना टीम वाळवीने केली आहे.

झाले असे, की   ७०वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा  नवी दिल्ली येथे नुकताच पार पडला.   वाळवी या मराठी चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरव या सोहळ्यात होणार होता.  जेव्हा या पुरस्काराची घोषणा झाली वाळवीच्या सर्वच कलाकार, तंत्रज्ञ यांनी जल्लोष साजरा केला होता. परंतु,  हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी चित्रपटाचे, दिग्दर्शक, कलाकार, सहकलाकार, लेखक, निर्माते यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणे महत्वाचे समजले नाही.  

 या पुरस्काराचा हा अपमान आहे.  तसेच  भर सभागृहात माय मराठीचाही अवमान झाल्याच्या प्रतिक्रिया सिनेसृष्टीतून उमटत आहेत.  ऑगस्ट महिन्यांत घोषणा होऊनही जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी पुरस्काराचं नाव घेतलं जातं, तेव्हा तो स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर मात्र कुणीच उपस्थित राहत नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  

या सर्व प्रकारावर लेखिका, अभिनेती, निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांनी सारवासारव केली आहे.    मराठी सिनेमाला मिळालेला हा सर्वोच्च सन्मान स्वीकारण्याची माझी मनापासून इच्छा होती. त्याचसाठी मी झी स्टुडिओकडे वारंवार पाठपुरावाही करत होते. त्यासाठी त्यांच्या अधिकावर्गाला जवळपास 30 च्या वर मेल्सही केले. पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं सकारात्मक उत्तर मिळालं नाही. इतकच नव्हे तर त्यांनी आमच्या मयसभा या निर्मिती संस्थेचंही नाव राष्ट्रीय समितीला कळवले नाही. दिग्दर्शक म्हणून परेशला निमंत्रण आले होतं. पण त्याला चित्रीकरणामुळे हजर राहता येणार नव्हते आणि या गोष्टीची कल्पना आम्ही पुरस्कार समितीला दिली होती., असे मधुगंधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, चित्रपटाचा, राज्याचा सन्मान महत्वाचा की मधुगंधा यांचा स्वत:चा इगो? तसेच परेश यांना एक दिवसही देशासाठी काढता येत नाही का? एक दिवस चित्रिकरण एरव्हीही कितीदा तांत्रिक अडचणींमुळे रद्द होते, मग एक दिवस चित्रिकरण बंद ठेवता आले नसते का? या प्रश्नांची सरबत्ती आता मोकाशी दाम्पत्यावर होणार आहे.