हातात आता तलवारीऐवजी संविधान

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-17 11:46:32

नवी दिल्ली : भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतीकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या स्वरूपात मोठा बदल करण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी  हटवण्यात आली आहे. जिच्या हाती तलवार होती तिथे संविधान दिसत आहे. न्यायमूर्तींच्या ग्रंथालयात हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसविण्यात आला आहे.
        भारतीय न्यायालयाने आता ब्रिटिश काळातील परंपरा मागे टाकून नवी पद्धत स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश कायद्यांत बदल करण्यात आले होते. आता भारतातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी यासंदर्भातील बदलांसाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या ग्रंथालयासमोर न्यायदेवतेची नवी मूर्ती बसवण्यात आली आहे. आधीच्या मूर्तीतील डोळ्यांवर पट्टी लावलेली असायची आणि एका हातात तराजू व दुसऱ्या हातात शिक्षा देण्यासाठी तलवार असायची. आता नव्या मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली आहे. हातात तलवारीऐवजी संविधानाची प्रत आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मते आता आपल्याला ब्रिटिशांच्या परंपरा व वारशाच्या पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच अंध असू शकत नाही. तो सर्वांना समान पद्धतीने पाहतो. यामुळेच सरन्यायाधीश न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल केला जाण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर देवीच्या एका हातात तलवारीच्या जागी संविधान पाहिजे, ज्यामुळे समाजात संदेश जाईल की, देवी संविधानानुसार न्याय करते. तलवार हिंसेचे प्रतीक आहे. न्यायालयात हिंसा नाही, तर संविधानाच्या कायद्यानुसार न्याय होतो. दुसऱ्या हातात असलेला तराजू योग्य आहे, जो सर्वांना समान पद्धतीने न्याय देतो.

न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी का होती?

न्यायव्यवस्थेच्या डोळ्यांवर काळी पट्टी असण्याचे कारण तिला व्यक्ती दिसत नाही. ती पुरावे पाहून न्यायनिवाडा करते. न्यायदेवता अंध नसून ती पट्टीनिरपेक्ष भाव दाखविण्यासाठी डोळ्यांवर आहे. स्त्री-पुरुष यासह अन्य कोणताही भेद न करता न्यायदान करणे, हे एकमेव कार्य केले जाते. न्यायदेवतेचे चित्र याचे प्रातिनिधिक आणि बोलके उदाहरण आहे. ‘डोळ्यांवर पट्टी बांधलेली, पाश्‍चात्य पोशाखातील, हातात तराजू घेऊन उभी असलेली आणि तराजूची दोन्ही पारडी समस्थितीत’, अशा रूपातील न्यायदेवतेचे चित्र सर्वत्र प्रचलित आहे.

न्यायदेवतेच्या नव्या पुतळ्यातील विशेष
संपूर्ण पुतळ्याचा रंग सफेद आहे.
पुतळ्यात न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले आहे. न्यायदेवता साडीत दाखवली आहे.
डोक्यावर सुंदर मुकुट आहे.
कपाळावर बिंदी, कानात व गळ्यात पारंपरिक दागिनेही दिसतात.
न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे.
दुसऱ्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे.
खरेतर न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायालयांत ठेवलेल्या पुतळ्याला 'लेडी जस्टिस' म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या डोळ्यांवर काळी पट्टी होती. आता ती हटवण्यात आली आहे.