ओमर अब्दुल्लांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-17 12:10:16
श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी (दि. १६) जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे हा कार्यक्रम झाला.
शपथविधी सोहळ्यासाठी खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपचे नेते संजय सिंह यांच्यासह सहा पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याने त्यांचा एकही आमदार मंत्री होणार नाही. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने ओमर सरकारला पाठिंबा दिला आहे. शपथविधी समारंभास इंडिया आघाडीमधील अनेक बडे नेते उपस्थित होते. राष्ट्रपती राजवट हटवून सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यसभेच्या चार जागांवरही निवडणूक होणार आहे. यासाठीच्या चर्चांना आतापासूनच वेग आला आहे. निवडणुकीत जिंकलेल्या जागांनुसार राज्यसभेच्या दोन जागा इंडिया आघाडीला आणि एक भाजपला जाऊ शकते. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांना राज्यसभेवर पाठविले जाऊ शकते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. उर्वरित एका जागेवर निवडणूक होऊ शकते. निवडणुकीत ही जागा कोणाला मिळणार हे त्यावेळच्या राजकीय समीकरणांवरच ठरणार आहे. २०१५ मध्येही अशीच परिस्थिती होती. तत्कालीन सत्ताधारी पीडीपी-भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. त्यानंतर एनसीने काँग्रेस उमेदवार (आता डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे नेते) गुलाम नबी आझाद यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीनंतर पीडीपी-भाजप युतीच्या खात्यात चौथी जागा आली.