तरुणाचा खूनप्रकरणी सात जणांना जन्मठेप

एका महिलेचा समावेश; सात वर्षांनी लागला निकाल

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-10-17 13:09:11

लोकनामा प्रतिनिधी

नाशिक : येथील तरुणाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेसह एकत्रित ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची घटना १३ जून २०१८ला पेठ रोडवरील फुलेनगर भागात घडली होती. या घटनेत मृताचे दोन मित्रही जखमी झाले होते. हा खटला न्यायाधीश जे. एम. दळवी यांच्यासमोर चालला.           

  जयराम नामदेव गायकवाड (वय ४४, रा. लक्ष्मणनगर, तेलंगवाडी), दशरथ नामदेव गायकवाड (२४), श्रीराम नामदेव गायकवाड (३६), सूरज जयराम गायकवाड (१९), अंबिका अर्जुन पवार (२८, रा. सर्व वैशालीनगर, पेठ रोड), संदीप चंद्रकांत पवार (२५, रा. अश्वमेधनगर, पेठ रोड) व राहुल चंद्रकांत पवार (१९, रा. देवळालीगाव बाजारपट्टी), अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.           

याबाबत सुनील सुखलाल गुंजाळ (वय २१, रा. वैशालीनगर, पेठ रोड) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी सुनील गुंजाळ, त्याचा भाऊ अनिल गुंजाळ, सागर माने व दीपक कोरडे आदी मित्र १३ जून २०१८ रोजी फुलेनगर परिसरातील लक्ष्मणनगर येथील (कै.) लक्ष्मण जाधव यांच्या नावाच्या बोर्डाजवळ गप्पा मारत उभे असताना ही घटना घडली होती.  याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खून, प्राणघातक हल्ला व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  तत्कालीन निरीक्षक विजय ढमाळ यांनी तपास करून दोषारोप न्यायालयात सादर केले होते. हा खटला न्या. जे. एस. दळवी यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे ॲड. एस. एस. गोरवाडकर व डॉ. सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले.