सलमान खानच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी
बिश्नोई गँगने केले होते जोरदार प्लॅनिंग
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-17 14:42:05
मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याच्या बंगल्याबाहेर गोळीबार करण्यात आला होता. तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आणि काहीतरी काळंबेरं शिजत असल्याची चाहुल लागली होती. ती शंका खरी ठरली आहे, कारण सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने 25 लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. यादृ्ष्टीने सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्याला आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बिश्नोई गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान सलमान खानच्या हत्येची योजना आखण्यात आली होती, असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, जवळपास 60 ते 70 लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. हे सर्वजण सलमान खानच्या मुंबईतील घर, पनवेलच्या फार्म हाऊस आणि गोरेगावमधील त्याच्या प्रत्येक हालचालीची बातमी पोहोचवत होते.
सलमान खानला मारण्यासाठी आरोपींनी पाकिस्तानातून AK 47, AK 92 आणि M 16 ही आधुनिक शस्त्रे विकत घेण्याचे प्लॅनिंग करण्यात आले होते.