अतुल परचुरे : एक अष्टपैलू अन् चतुरस्र अभिनेता
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-18 13:16:43
माणसाचे महत्त्व नेहमी तो गेल्यावर कळते. त्यातीलच एक ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते अतुल परचुरे. काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. एका मुलाखतीदरम्यान अतुल परचुरे असे म्हणाले होते की, विनोदी भूमिका करणे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आपल्याकडे अशा कलाकारांना हलक्यात घ्यायची मानसिकता आहे. जिथे विख्यात चार्ली चॅप्लिनसारख्या नटाची अभिनेता म्हणून ऑस्करने कधी दाद घेतली नाही, तिथे आमच्यासारख्याची काय कथा, अशी खंत त्यांच्या मनात शेवटपर्यंत राहिली.
आवाजातील माधुर्य, स्वच्छ वाणी, उत्तम वाचन, चिंतन, मनन, शब्दांच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची आस, विनोदाची सूक्ष्म जाण अशी सगळी आयुधे रंगकर्मी म्हणून जवळ बाळगणारे अभ्यासू अभिनेते अशी त्यांची ओळख होती. शब्दांवर हुकूमत असणाऱ्या या नटाची अत्यंत गाजलेली भूमिका जयवंत दळवीलिखित 'नातीगोती' नाटकातील मतिमंद बच्चूची होती; ज्यात त्यांना एकही संवाद नव्हता. शालेय वयात 'बजरबट्टू' नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले. त्याआधीच टीव्ही आणि चित्रपटाचा श्रीगणेशा केला होता. 'टिळक आणि आगरकर'मधून त्यांचे व्यावसायिक नाटकांत पदार्पण झाले. मग, ‘वासूची सासू’, ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘अफलातून’, ‘बे दुणे पाच’, ‘ए भाऊ, डोकं नको खाऊ’, ‘वाह गुरू’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी वैविध्यपूर्ण भूमिकांची रांगच लागली. त्यांची ही नाटके विशेष गाजली, पण त्यांची अजरामर ठरली ती भूमिका म्हणजे 'व्यक्ती आणि वल्ली' मधील पु.लं.ची भूमिका. प्रत्यक्ष भाईंनीही या भूमिकेला दाद दिली होती. दिलीप प्रभावळकर, मधुकर तोरडमल, मोहन जोशी, प्रशांत दामले, राजा गोसावी यांसारख्या श्रेष्ठ नटांबरोबर काम करण्याची संधी अतुल परचुरे यांना मिळाली. हे दिग्गज नट म्हणजे रंगभूमीला लाभलेले वरदान आहे, या प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळाले ही त्यांची भावना होती. प्रत्येक दिग्दर्शकाच्या शैलीशी जुळवून घेत आपली सर्जनशीलता त्यांनी विस्तारली. पुढे मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, जाहिरातपट, इंग्लिश नाटके असा चौफेर प्रवास त्यांनी केला आणि प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडण्यात ते यशस्वी झाले. सहकलाकारांबरोबरचे त्यांचे विनोदाचे, शब्दफेकीचे ट्युनिंग अफलातून जुळलेले प्रत्येक ठिकाणी दिसले.
'आंतरनाट्य'सारख्या संस्थेतून सक्रिय राहिल्याने नाटक ही गंभीरपणेच करायची गोष्ट आहे हे त्यांच्या मनावर कायमचे ठसले होते. ठरवून काही कधी केले नाही, प्रयोगागणिक ते सापडत गेले, ते कधी जपले, कधी नकळतपणी ते विसरले गेले, असे ते मागे वळून पाहताना म्हणत. अतुल परचुरे म्हणजे पु.ल. हे जे समीकरण रसिकांच्या मनात तयार झाले होते, त्याचा त्यांना रास्त अभिमान होता. मात्र, काही लक्षणीय भूमिका वगळता रसिकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील अशी भूमिका आपल्याला मिळाली नाही, पण ती मिळेल असा आशावाद ते शेवटपर्यंत बाळगून होते. जुन्या जाणत्या दिग्दर्शकांबरोबरच संतोष पवार यांच्यासारख्या हुशार दिग्दर्शकासमवेत आपल्याला काम करायला मिळाले याचाही ते आवर्जून उल्लेख करत. वरकरणी मी कितीही 'हॅप्पी गो लकी' दिसत असलो, तरीही चांगल्या भूमिकेसाठी मी कायम अस्वस्थ असतो, असे एका मुलाखतीत ते म्हणाले होते. त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली, हे दुर्दैव. विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिकांचं प्रचंड कौतुक झाले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आणि मालिका विश्वातही अतुल परचुरे यांचे मोठे नाव होते. अनेक मराठी चित्रपटांसह नाटके आणि मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजलेल्या होत्या. टीव्ही मालिकांचा विचार करता, त्यांची ‘आर. के. लक्ष्मण की दुनिया’ ही मालिका चांगलीच गाजली होती. आर. के. लक्ष्मण यांच्या कल्पनेतील ‘कॉमन मॅन’ अतुल परचुरे यांनी या मालिकेतून अत्यंत उत्तमपणे छोट्या पडद्यावर साकारला होता. त्याशिवाय हिंदीमधील त्यांच्या ‘यम है हम’, ‘बडी दूर से आये है’ अशा मालिकाही प्रचंड गाजल्या होत्या. कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्येही त्यांच्या विनोदी अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. मराठी मालिकांचा विचार करता मोहन या नावाने ते घराघरांत पोहोचले होते. ‘जागो मोहन प्यारे’ आणि नंतर ‘भागो मोहन प्यारे’ या दोन मालिकांमधील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. त्याशिवाय ‘अळी मिळी गुपचिळी’, ‘माझा होशील ना’ अशा अनेक मालिकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. नाटकांमध्ये ‘तरुण तुर्क’ हे त्यांचं प्रचंड गाजलेलं नाटक होतं. त्याशिवाय प्रियतमा, वासूची सासू, वाह गुरू, आम्ही आणि आमचे बाप यांतही त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीत शाहरूख खानसह अनेक मोठ्या अभिनेत्यांबरोबर अतुल परचुरे रूपेरी पडद्यावर झळकले होते. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘क्या दिल ने कहा’, ‘स्टाईल’, ‘क्योंकी’, ‘गोलमाल’, ‘बिल्लू बार्बर’ या चित्रपटांत त्यांच्या भूमिका होत्या.
दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सबंध आयुष्य गेल्याने लहानपणापासून क्रिकेटचे वेड त्यांना होते, पण त्यात करिअर करण्याची आपली पात्रता नाही हे वेळीच जाणवून पुढे एक जाणकार क्रिकेटवेडे म्हणून जगभर ते मॅचेस पाहायला जात. एक अभ्यासू, साहित्यावर नितांत प्रेम करणारा आणि तितकाच जीवनावर प्रेम करणारा माणूस आपण त्यांच्या रूपात गमावला आहे. कर्करोगावर मात करण्याची जिद्द त्यांनी बाळगली होती; पण उपचारांनी साथ दिली नाही. सुधीर जोशी, विजय चव्हाण, विजय कदम हे विनोदी नट असा शिक्का बसलेले, पण मराठी रंगभूमीवर खऱ्या अर्थाने रमलेले अभिनेतेही चुटपुट लावूनच गेले, त्यांच्याइतकेही आयुष्य अतुल परचुरे यांना लाभले नाही. त्यांचा मृत्यू हा १९८० च्या दशकातील सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, मोहन गोखले अशा अभिनेत्यांच्या जाण्याइतपत अकाली ठरला. रंगभूमी कुणासाठी थांबत नसते हे खरेच; तरीही अशा अभिनेत्यांनी पुढे काहीतरी आणखी महत्त्वाचे केले असते, याची रुखरुख कायम लागून राहते.
-डॉ.संदीप तपासे ( ९८२२८८०२९८ )