‘इमर्जन्सी’ला हिरवा कंदील
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-18 13:37:43
मुंबई : प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डानं हिरवा कंदील दाखवला आहे. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना लावण्यात आलेल्या आणीबाणीच्या ऐतिहासिक संदर्भावर आधारित हा सिनेमा अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला होता. कंगना राणावत या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या प्रमुख भूमिकेत असणार आहे. कंगनाने याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली आहे. सेन्सॉर बोर्डाने इमर्जन्सी चित्रपटाबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी सेन्सॉरने U/A सर्टिफिकेटही दिले आहे. इमर्जन्सी चित्रपट ६ सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र, त्यानंतरही तो सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता.चित्रपटात दहा मोठे बदल करावे लागणार असल्याचे सेन्सॉरने सांगितले होते. तीन दृश्य काढून टाकणे, वादग्रस्त विधाने काढणे, वस्तुस्थिती दाखवा, असे सेन्सॉरने सुचविलेल्या बदलानुसार इमर्जन्सी चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सेन्सॉरने आता या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे. लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल, असेही कंगनाने आपल्या ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.