'आपण ३१ व्या वर्षी मरणार'

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-18 13:39:14

भूमिका, बाजार, मंडी, चक्र, अर्थ,  अर्धसत्य, मिर्च मसाला, उंबरठा यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या सहजसंुदर अभिनयाची छाप सोडून गेलेल्या स्मिता पाटील यांना विसरणे चाहत्यांसाठी अशक्य आहे. स्मिता यांनी त्यांच्या सशक्त व सकस भूमिकांमध्ये प्राण फुंकले होते. सावळा रंग, बारीक शरीरयष्टीमुळे कोणत्याही अँगलने हिरोईन भासत नसलेल्या स्मिता यांच्याकडे  लांब केस, धरधरीत नाक, टपोरे डोळे मात्र होते. जोडीला होता बावनकशी अभिनय. म्हणूनच त्यांच्यासारखी अभिनेत्री दुसरी होणार नाही. मात्र, पडद्यावर एवढ्या धीरगंभीर, आशयसंपन्न भूमिका साकारणाऱ्या स्मिता वैयक्तिक आयुष्यात तेवढ्या गंभीर नव्हत्या किंवा त्यांनी जीवनाकडे सजगतेने पाहिले नाही, असे वाटून जाणाऱ्या काही घटना आहेत. 

       एकतर त्यांचा राज बब्बर यांच्याशी विवाह करण्याचा निर्णयदेखील वादग्रस्त ठरला होता. दुसरीकडे, स्मिता यांना ज्योतिषशास्त्राची खूप आवड होती. त्यांचा अभ्यास नव्हता, पण त्यांना त्यात रुची होती. ते त्यांना कळायचे. खूप संकटांची चाहूल त्यांना आधीच लागायची, असे बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. चित्रकार व लेखक सुभाष अवचट यांनी स्मिता यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला आहे. सुभाष अवचट आणि स्मिता एकदा ताज हॉटेलच्या लिफ्टमधून जात असताना स्मिता यांनी एका परदेशी व्यक्तीला पाहिले. त्यांनी सुभाष अवचट यांना सांगितले, 'या माणसाला विचारा की त्याचा नुकताच अपघात झाला का? त्याच्या डाव्या खांद्याला मार बसून फ्रॅक्चर झाले का?' स्मिता यांनी सांगितल्याप्रमाणे अवचट यांनी त्या परदेशी व्यक्तीला विचारले, की त्याच्या बाबतीत असे काही झाले का? अवचट सरांच्या प्रश्नावर ती परदेशी व्यक्ती अचंबित झाली आणि म्हणाली, “हे अगदी खरंय! पण  तुम्हाला कसे कळालं? हा होता स्मिता यांचा अफलातून सिक्स्थ सेन्स. 
             स्मिता यांच्या संदर्भातील अजून एक किस्सा नेहमी सांगितला जातो. तो असा की, अमिताभ बच्चन ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी बेंगळुरूला आले होते. तेव्हा रात्री दोन वाजता त्यांना फोन आला. अमिताभ यांच्या सेक्रेटरीने त्यांना उठवून सांगितले, की स्मिता पाटील फोनवर आहेत. यापूर्वी कधीही स्मिताने अमिताभ यांना फोन केला नव्हता. त्यामुळे काहीतरी अर्जंट काम असणार, असा विचार करून अमिताभ यांनी फोन घेतला. फोनवर आलेल्या अमिताभ यांना स्मिताने काळजीपूर्वक विचारलं,'सर्वकाही ठीक-ठाक आहे ना? मी आताच एक वाईट स्वप्न पाहिलं. त्यात तुम्हाला अपघात झालाय. म्हणून ख्यालीखुशाली पाहण्यासाठी कॉल केला.' स्मिताचं बोलणं ऐकून हसतहसतच अमिताभ यांनी आपण सहीसलामत असून, काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे सांगितले. पण दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा अमिताभ शूटिंगसाठी गेले त्यावेळी 'कुली'च्या सेटवर त्यांना जबरदस्त अपघात झाला. पुनीत इस्सार यांनी मारामारीच्या सीनमध्ये लावलेला ठोसा पोटात वर्मी बसला आणि अमिताभ मरणाच्या दारात पोहोचले होते. स्मिता यांची सर्वांत मोठी भविष्यवाणी खरी ठरली. ती होती, त्यांच्या मृत्यूची. पूनम धिल्लन यांच्याशी बोलताना स्मिता म्हणाल्या होत्या, 'पूनम आपण ३१ व्या वर्षी मरणार' आणि स्मिता यांचे निधन झाले तेव्हा त्या खरंच ३१ वर्षांच्या होत्या. स्मिता यांना जोडीदाराविषयीचेच भविष्य कसे कळले नाही, असेही चाहते नंतर म्हणायचे.