फरारी संदीप अवधूतला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-10-18 14:04:59
लोकनामा प्रतिनिधी
वणी : आदिवासींचे आर्थिक शोषण, आमिष दाखवून ठकबाजीचा गुन्हा दाखल असलेला फरारी संशयित संदीप अवधूत याला अभोणा, दिंडोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले. अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकापूर येथील आदिवासी शेतकरी सुभाष सोमा बागूल यांना शेतजमिनीच्या वारस नोंदीचे आमिष दाखवून दीड लाखांना कथित तोतया पत्रकार संदीप भिकाजी अवधूत (रा. दत्तनगर, कसबे वणी, ता. दिंडोरी) याने फसवणूक केल्याच्या तक्रारीनंतर, चौकशीअंती सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी अवधूत याच्याविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल केला होता.
अटक टाळण्यासाठी त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु तो फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने ४ सप्टेंबर २०२४ ला फेटाळला. त्यानंतर संदीप अवधूत फरारी झाला होता. तब्बल ४४ दिवसांनंतर फरारी संदीप अवधूत दिंडोरी तहसील कार्यालयात असल्याची माहिती अभोणा पोलिसांना मिळाली. अभोणा पोलिसांनी ही माहिती व अवधूत याचे तपशीलवार वर्णन दिंडोरी पोलिसांना दिले. त्याचक्षणी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिंडोरी पोलिसांनी झडप घालून अवधूतच्या मुसक्या आवळून अभोणा पोलिसांच्या ताब्यात दिले.
अवधूत याच्याविरोधात वणी पोलिसांत शेतकऱ्याला अनुदानातून कमी किमतीत ट्रॅक्टर घेऊन देतो, असे आमिष दाखवून ९१ हजार ५०० रुपयांचे आर्थिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल होता. वणी पोलीसही त्याचा शोध घेत होते. अभोणा व सुरगाणा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीच्या तक्रारी प्रलंबित आहेत.