सातपुतेपाडा ग्रामस्थांनी श्रमदानातून साकारला रस्ता

आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय; मूलभूत सुविधांपासून वंचित

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

दिंडोरी : पेठ तालुक्यातील सातपुतेपाड्यातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी व श्रमदानातून तालुक्याला जाण्यासाठी नदीतील पाणी अडवून रस्ता साकारला. उमेदवार निवडणूक काळात केवळ आश्वासने देतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
जुनोठीपैकी सातपुतेपाडा ते पेठ हे सहा किलोमीटर अंतर आहे. लोकसंख्या साधारण १५० ते २०० च्या जवळपास आहे. सातपुतेपाड्याजवळील नदीपासून दोन किलोमीटर रस्ताच नाही. त्यानंतर डांबरी रस्ता लागतो. ग्रामस्थांना दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

 दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने दरवर्षी लोकवर्गणीतून रस्ता करावा लागतो. विद्यार्थी व ग्रामस्थ या रस्त्याने तालुक्याच्या गावी जातात. देशाच्या अमृत महोत्सवातही ग्रामस्थांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. 
सातपुतेपाड्याच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद प्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नदीत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार केला आहे. रस्ता, मूलभूत सुविधा मिळण्यासाठी पाड्यातील ग्रामस्थ निवेदने देतात. मात्र, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. 

शासन दखल घेत नसल्याने  सातपुतेपाड्यातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी व श्रमदानातून नदीपात्रात रस्ता साकारला आहे. आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर येत्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान केले जाणार नाही, असे सांगण्यात आले.