वक्फ विधेयकावरील चर्चेवर खडाजंगी
गैरवर्तनाबद्दल बॅनर्जी एक दिवस निलंबित
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-23 12:40:57
नवी दिल्ली : वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालमधील श्रीरामपूरचे खासदार कल्याण बॅनर्जी, भाजप नेते अभिजित गंगोपाध्याय यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी बॅनर्जी यांनी रागाच्या भरात पाण्याची काचेची बाटली फोडली. त्यात त्यांच्याच बोटाला दुखापत झाली. या गैरवर्तनाबद्दल बॅनर्जी यांना जेपीसीमधून एक दिवसासाठी निलंबित केले आहे.
वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी निवृत्त न्यायमूर्ती व वकिलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे खासदार जगदंबिका पाल होते. कटक येथील जस्टिस इन रिअॅलिटी आणि पंचसखा बनी प्रचार मंडळ यासंदर्भात म्हणणे मांडत होते. त्यावेळी बॅनर्जी यांनी मध्ये बोलू देण्याची विनंती केली. बॅनर्जींनी आधीच आपले मत मांडले असल्याने अध्यक्षांनी त्यांना बोलण्यास नकार दिला. तरीही बॅनर्जी अधूनमधून बोलण्याची विनंती करत होते. भाजपचे अभिजित गंगोपाध्याय यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. त्यातून दोघांत बाचाबाची झाली व परिस्थिती चिघळली. बॅनर्जी यांनी रागाच्या भरात पाण्याची काचेची बाटली उचलून टेबलावर आदळली. त्यामुळे त्यांच्या अंगठ्याला आणि तर्जनीला जखम झाली. या घटनेनंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) नेते असदुद्दीन ओवैसी, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी बॅनर्जींना बैठकीतून बाहेर काढून प्रथमोपचारासाठी नेले.