‘जिगरा’ आता ओटीटीवर
बॉक्स ऑफिसवर ठरला आपटीबार
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-23 14:55:03
आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. तसं आलियाचा चित्रपट म्हटला, की त्याची चर्चा होतेच. ‘हायवे’, ‘राझी’, ‘डिअर जिंदगी’, ‘गंगूबाई काठियावाड’सारखे वेगळ्या धाटणीचे, आशयाचे चित्रपट देणाऱ्या आलियाच्या प्रत्येक भूमिकेबद्दलही तिच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. म्हणूनच ११ ऑक्टोबरला रिलीज झालेल्या आलियाच्या जिगरा या सिनेमाचीदेखील प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाची निर्मिती आलियाने स्वत: केली आहे. आणि ती या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची ओपनिंग चांगली झाली होती. प्रमोशनही दणक्यात झाले होते. मात्र त्यानंतर रसिकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. हा चित्रपट आलियाच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा फ्लॉप समजला जात आहे. चित्रपट फ्लॉप झाल्यावर आलियाला तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक वासन बाला यांना टीकेला सामोरे जावे लागले. मात्र वासन यांनी अपयशाची जबाबदारी घेतली . आलियाने इतर चित्रपट नाकारून माझ्यासोबत काम केले, तिच्या तोडीचा सिनेमा आम्ही करू शकलो नाही असे ते म्हणाले. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर आपटी बार ठरल्यानंतर जिगरा आता नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला ओटीटीवर रिलीज होणार आहे. जिगरा या चित्रपटाचे स्ट्रिमिंग अधिकार नेटफ्लिक्सला मिळाले आहेत. आलियाने या चित्रपटात वकिलाची (सत्या) भूमिका साकारली आहे. तर वेदांग रैनाने अंकुरची म्हणजेच आलियाच्या भावाची भूमिका साकारली आहे.