...तर मी वेडी झाले असते!

ऋषी यांच्या निधनानंतर खचल्या होत्या नीतु

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-23 14:57:04

ऋषी कूपर आणि नीतू सिंग यांचे नाते हळुवार होते.  दोघांनी लग्न केले, तेव्हा नीतू केवळ वीस वर्षांची होती. त्यांचे करिअर चांगले आकार घेत होते, पण घर सांभाळण्यासाठी त्यांनी चित्रपटातून माघार घेतली. ऋषी इतके अल्लड होते की, नीतू यांनाच सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत. म्हणूनच नीतू साध्या वॉशरूमला जरी गेल्या तरी ऋषी यांचे तेवढ्या वेळात एक पानही हलत नव्हते. नीतू केव्हा बाहेर येईल, मला काय हवं-नको ते पाहील, असे ऋषी यांना व्हायचे.  यामुळेच ऋषी कपूर यांच्या निधनाचा धक्का नीतू सहन करू शकल्या नव्हत्या.  या दु:खातून सावरणे त्यांना कठीण झाले होते. म्हणूनच त्यांनी पुन्हा चित्रपट करायचे ठरवले. मी जर पुन्हा काम केले नसते, तर मी वेडी झाले असते, असे त्या म्हणतात. नीतू कपूर यांनी 'जुग जुग जियो' या चित्रपटातून पुनरागमन केले. तसेच ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज’ या नेटफ्लिक्स सिरीजमध्येदेखील त्या दिसल्या होत्या. मात्र, लग्नानंतर पती, सासू-सासरे, मुले, नातवंडं या विश्वात रममाण झालेल्या, ऋषी यांच्या निधनाने संपूर्णतः कोलमडून पडलेल्या नीतू यांच्यासाठी हे कमबॅक सोपे नव्हते. कॅमेऱ्याला इतक्या वर्षांनी सामोरे जाताना मी अक्षरशः थरथर कापायचे, इतका माझा आत्मविश्वास गळून पडला होता, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. ऋषी यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे खूप कठीण दिवस होते ते माझ्यासाठी, असे नीतू म्हणतात.  रणबीर माझ्या पाठीशी भक्कम, खंबीरपणे उभा राहिला. म्हणूनच पुन्हा काम करू शकले, असेही त्या म्हणतात. दरम्यान, नीतू यांचा ‘लेटर्स टू मिस्टर खन्ना’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होत आहे.