राष्ट्रकुल स्पर्धेतून हॉकी, कुस्ती, क्रिकेटला डच्चू
भारताला बसणार फटका
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-10-24 14:59:07
लंडन : खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल स्पर्धा- २०२६ ग्लासगो संयोजन समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धा दि. २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. ग्लासगो येथे १२ वर्षांनी ही स्पर्धा पार पडणार आहे.
स्पर्धा सुरळीत आणि यशस्वी तसेच आर्थिकदृष्ट्या यशस्वी पार पाडण्यासाठी आम्ही १० क्रीडा प्रकारांतच स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने निवेदनात म्हटले आहे. या स्पर्धा रद्द होण्याच्या वाटेवर असतानाच ग्लासगो शहराने अगदी ऐनवेळेस या स्पर्धा घेण्याची तयारी दर्शवली. कमी खर्चात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संयोजन समितीने स्पर्धेत स्पर्धा १० क्रीडा प्रकारांत घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये टेबल टेनिस, स्क्वॅश आणि ट्रायथलॉन या खेळांवरही संयोजन समितीने फुली मारली आहे. स्पर्धा केवळ चारच केंद्रांवर खेळविण्यात येणार आहे. वगळलेल्या खेळांवर लक्ष टाकल्यास सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. वगळण्यात आलेल्या प्रत्येक खेळात अखेरच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकांची कमाई केली होती.
२०२६ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत ॲथलेटिक्स, पॅरा ॲथलेटिक्स (ट्रॅक अँड फिल्ड), जलतरण, पॅरा जलतरण, कलात्मक जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅरा वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्यूदो, बाऊल्स, पॅरा बाऊल्स, ३ बाय ३ बास्केटबॉल, ३ बाय ३ व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचा समावेश करण्यात आला आहे.