चर्चा आलियाच्या घागऱ्याची

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत स्टार्सची मांदियाळी

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-24 15:07:54

बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्या सुरू झाल्या आहेत. एक ग्रॅण्ड दिवाळी पार्टी सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने आयोजित केलेल्या या भव्य दिवाळी पार्टीत अनेक स्टार्सनी आपला जलवा दाखवला. यावेळी रेखा केशरी रंगाच्या भरजरी साडीत पुन्हा एकदा भाव खाऊन गेली. शबाना आझमी एलिगंटची लूकची चर्चादेखील होती. काजोलचा वेस्टर्न लूक भुवया उंचावणारा ठरला, तर आलियाचा रि-यूज मंत्रा सर्वांत लक्षवेधक ठरला. आलियाने तिच्या लग्नातील मेंदी समारंभाचाच घागरा या पार्टीसाठी चॉइस केला होता. यापूर्वीही आलियाने राष्ट्रीय पुरस्कार समारंभासाठी तिच्या लग्नातील साडी नेसून  रि-यूज संदेश दिला होता. बॉलिवूड कलाकार अगदी दररोजच त्यांच्या वेगवेगळ्या लूकसाठी खटाटोप करताना दिसत असतात. एअरपोर्ट लूकपासून तर  अगदी बक्षीस समारंभ, मुलाखत या सगळ्याच प्रसंगांसाठी महागडे कॉस्च्युम, हटके लूकसाठी ते आग्रही असतात. या पार्श्वभूमीवर आलिया रि-युज हा संदेश अनेक दिवसांपासून देऊ पाहतेय. आलियाच्या या स्टॅण्डचे अनेकांनी कौतुक केले आहे. असा हॅशटॅगच आलियाने चालवला  होता. त्यालाही भरपूर प्रतिसाद लाभला होता. 
     दरम्यान, जान्हवी कपूर, करिष्मा कपूर, श्रद्धा कपूर, क्रिती सेनन, ऊर्मिला मातोंडकर, तमन्ना भाटिया, विजय, रितेश-जेनेलिया, अनन्या पांडे, काजोल, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, रेखा, वरुण धवन, अर्जुन कपूर, रवीना टंडन, शबाना आझमी, कियारा अडवानी, सिद्धार्थ मल्होत्रा, सुहाना खान, खुशी कपूर, गौरी खान, इशा अंबानी, राधिका मर्चंट, करण जोहर, आदित्य रॉय- कपूर, शाहीद कपूर, मीरा राजपूत, अशी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी या जंगी, आलिशान पार्टीसाठी बघायला मिळाली. या साऱ्यांनीच पारंपरिक पेहरावाला पसंती दिली होती.  
    हत्येची धमकी मिळाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खानने या पार्टीला हजेरी लावली नाही; परंतु त्याची बहीण अर्पिता खान तिचा पती आयुष शर्माबरोबर उपस्थित होती. त्यांचे स्वागत दिग्गज अभिनेत्री रेखाने केले.