उत्सुकता ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ची
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-24 15:10:15
परेश मोकाशी म्हटले की, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि.सौ.कां’, ‘वाळवी’ हे वेगळ्या धाटणीचे, हलके फुलके पण काहीतरी छान संदेश देणारे चित्रपट डोळ्यासमोर येतात. सहज सुंदर मांडणी, उत्कृष्ट पटकथा, आशयसंपन्न कथानक, जोडीला मनोरंजन ही मोकाशी यांच्या चित्रपटाची वैशिष्ट्ये राहिली आहेत. हिंदीत जसा आमिर खानचा पुढचा चित्रपट कोणता? याची उत्सुकता असते, तशीच उत्सुकता मराठी चित्रपटसृष्टीत मोकाशी यांच्या चित्रपटाविषयी असते. आता ही उत्सुकता संपली असून, मोकाशी यांचा ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हा चित्रपट लवकरच म्हणजे १ जानेवारी २०२५ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. परेश मोकाशी यांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शन केलेल्या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकावर हा सिनेमा आधारित आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. सन २००१ मध्ये हे नाटक रंगमंचावर आले होते. याच नाटकाचे रूपांतर चित्रपटात करताना परेश मोकाशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे, तर मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखन केले आहे. प्रशांत दामले यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. यात हिटलरच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. ‘मु.पो. बोंबिलवाडी- १९४२ एका बॉम्बची बोंब’ या चित्रपटाची घोषणा करून चित्रपटाचे पोस्टर मधुगंधा व परेश यांनी काही दिवसांपूर्वी रिलीज केले होते. मु. पो. बोंबिलवाडी या चित्रपटात प्रशांत दामले थेट हिटलरच्या रूपात बघणे म्हणजे एक प्रकारचा धक्काच आहे. म्हणूनच हा हिटलर वेगळा असेल, असे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटामुळे हसून फुप्फुसांना व्यायाम होईल, असे परेश मोकाशी यांनी म्हटले आहे. वैभव मांगले, प्रणव रावराणे, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत.