सलमानला माफी मागावीच लागेल
रमेश बिश्नोईचा इशारा
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-10-24 15:29:51
मुंबइ; : सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी कोणत्याही परिस्थितीत माफी मागावी लागेल, असे म्हणत लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई याने सलमान खानवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सलमान खानने माफी मागितली नाही, तर त्याच्यासाठी कायमच धोका राहिलं, असेही त्याने म्हटले आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या करुन बिश्नोई गँगने खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळेच सलमान खान आता या यादीतील पुढचे नाव आहे. यापूर्वीही सलमानच्या घराबाहेर गोळीबार करुन सतर्कतेचा इशारा या गँगने सलमानला दिलाच होता. आता मात्र सलमानच्या हत्येची सुपारीच घेतली असल्याचे जाहीर करुन टाकल्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असली तरी बिश्नोई गँगकडून धमक्या सुरु आहेत.
लॉरेन्स बिश्नोई याचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई याने आता सलमानला धमकी दिली आहे. संपूर्ण बिश्नोई समाज काळवीट प्रकरणावर लॉरेन्स बिश्नोईच्या पाठीशी उभा आहे. सलमान खानच्या कुटुंबाने आमच्या धार्मिक दुखावल्या आहे. आमच्या समाजाच्या धार्मिक भावनांशी खेळ केल्यामुळे त्यांनी समाजाची माफी मागितली पाहिजे, असे त्याने म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे.
सलमान खानने माफी न मागितल्यास त्याला कायद्यानुसार न्याय मिळेल. प्राणी आणि वृक्ष हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेले आम्ही सहन करू शकत नाही. सलमान खानने काळविटाची शिकार केल्याने आम्हा सर्वांचे रक्त उसळलेआहे. त्याने माफी मागावी, अन्यथा त्याचा जीवाला असाच धोका राहील, असेही रमेशने पुढे म्हटले आहे.