बिश्नोईच्या भावावर दहा लाखांचे बक्षीस
सिद्दीकी हत्या; पाकमधून ड्रोनद्वारे पिस्तूल भारतात?
Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-10-26 12:54:53
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला पकडण्यासाठी दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात त्याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
अनमोल बिश्नोईवर सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोपही आहे. गेल्या एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अनमोलचा समावेश होता. त्यावेळी फेसबुकवर पोस्ट करत त्याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींना शस्त्रे पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. याशिवाय अनमोल बिश्नोईवर खंडणीशी संबंधित १८ गुन्हेही दाखल केले आहेत. मात्र, २०२२ मध्ये तो बनावट पासपोर्टच्या आधारे देश सोडून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनमोल बिश्नोईबाबत नागरिकांना काही माहिती मिळाल्यास ती पोलिसांना द्यावी, असे आवाहन एनआयएने केले आहे. त्याची माहिती देणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षीसही एनआयएने जाहीर केले आहे.
सिद्दिकी हत्याकांडाचे ऑस्ट्रेलिया कनेक्शन
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आत्तापर्यंत १५ संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन शस्त्रांची माहिती होती. मात्र, संशयितांकडे तीन नव्हे, तर चार शस्त्रे असल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी वापरलेले चौथे पिस्तूल हे ऑस्ट्रेलियानिर्मित ब्रेटा कंपनीचे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अशा प्रकारचे विदेशी पिस्तूल पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे भारतात पाठवले जाते, असा दावा पोलिसांनी केला आहे.