१३८ कोटींच्या सोन्याने भरलेला टेम्पो सापडला

हिंगोलीतून एक कोटीची रोकड जप्त

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-10-26 12:59:15


मुंबई : निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सर्वत्र नाकाबंदी व वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीत काळा पैसा व आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड सापडत आहे. अशातच शुक्रवारी (दि. २५) पुण्यात १३८ कोटींचे सोने पकडले गेले. हिंगोलीत नाकाबंदीदरम्यान बसस्थानक परिसरात पोलिसांना इनोव्हा कारमध्ये एक कोटी ४० लाखांची रोकड सापडली आहे.
          खेड-शिवापूर टोलनाक्यावर पाच कोटींची रोकड जप्त केल्यानंतर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले आहे. पुणे-सातारा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात हे सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं आलं कुठून?  कुठे जात होतं? कोणाचं होतं? याचा तपास केला जात आहे. हा टेम्पो एका खाजगी लॉजिस्टिक कंपनीचा असून, यातील सोने पुण्यातील एका व्यापाऱ्याकडे जात होते, अशी माहिती समोर आली आहे.  हिंगोलीतही पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका कारमधून एक कोटी ४० लाखांची रक्कम जप्त केली. प्राथमिक तपासात ही रोकड एका बँकेची असल्याची माहिती समोर आली आहे.