वॉशिंग्टन ठरला किवीजसाठी अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-10-26 14:37:47
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. डेव्हन कॉनवे आणि रचिन रवींद्रच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने सामन्याच्या पहिल्या दिवशी २५९ धावा फलकावर लावल्या. यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरने सात बळी घेत किवी संघाला झटपट गुंडाळले, तर उर्वरित तीन विकेट आर. अश्विनच्या खात्यात आल्या. रोहितने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन बदल केले आहेत. के.एल. राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना वगळून भारतीय कर्णधाराने शुभमन गिल, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान दिले. एकाच वेळी तीन बदल केल्यामुळे कर्णधार नाणेफेकीदरम्यान चर्चेत राहिला.
बेंगळुरू कसोटीप्रमाणे पुण्यातही डेव्हन कॉनवे आणि रचिन रवींद्र हे दोन फलंदाज न्यूझीलंडकडून चमकले. बेंगळुरू कसोटीनंतर जेव्हा टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली, तेव्हा त्यात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता. सुंदरने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार शतक झळकावले होते. मात्र, कुलदीप यादव बाहेर गेला तर अक्षर पटेलला प्रथम संघात संधी मिळेल, असे सर्वांना वाटत होते. पण रोहितने हे केले नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने लगेच सुंदरला संधी दिली आणि या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली. आर. अश्विनने आपल्या पहिल्याच षटकात किवी कर्णधाराला बळी बनवले. यानंतर त्याने विल यंगला बाद केले आणि डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत पहिले स्थान मिळवले. तिसरी विकेट म्हणून त्याने धोकादायक दिसणाऱ्या डेव्हन कॉनवेला बाद केले. अश्विनने पहिल्या तीन विकेट घेतल्या, पण वॉशिंग्टन सुंदर आक्रमणावर येताच बाकीच्या गोलंदाजांना काहीच मिळाले नाही. तब्बल चार वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या सुंदरने पहिल्याच डावात सात बळी घेत न्यूझीलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. वॉशिंग्टनच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडला कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने एकमेव मोठे यश मिळाले.
माजी किवी कर्णधार टीम साऊदीने खाते उघडू न देताच हिटमॅनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. साऊदीने रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौदाव्यांदा बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराची शून्यावर बाद होण्याची ही ३४ वी खेळी होती. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा तो भारताचा संयुक्त सहावा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदरने गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करत भारदस्त कामगिरी केली.
दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने सात विकेट घेतल्या. कसोटीत तो पहिल्यांदाच पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्यात यशस्वी ठरला. वॉशिंग्टनला तीन वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय कसोटी संघात स्थान मिळविण्यात यश आले आणि पहिल्याच सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली. सुंदरने ऑफ स्टम्पच्या रेषेचा उत्कृष्ट वापर करत या सातपैकी पाच फलंदाजांना त्याने चक्क त्रिफळाचित करून मामा बनवले. वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात त्याने किवी फलंदाजांना टिकून राहण्याची संधीही दिली नाही. सुंदरने ५९ धावांत सात बळी घेत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. या दोन देशांतील कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुंदरचे नाव जोडले गेले आहे. भारतीय भूमीवर कसोटी सामन्यातील सर्व दहा बळी उजव्या हाताच्या ऑफस्पिनर्सने घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, सात बळी घेणारा सुंदर व तीन बळी घेणारा आश्विन दोघेही तामिळनाडू (चेन्नई)चे आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी एस. वेंकटराघवन याने दिल्लीत सन १९६५ मध्ये ७२ धावांत पाच, ईरापल्ली प्रसन्नाने १९७५ मध्ये ७६ धावांत आठ, २०१७ मध्ये इंदोर येथे अश्विनने ५९ धावांत सात बळी, तर सन २०२४ च्या चालू पुणे कसोटीत वॉशिंग्टन सुंदरने ५९ धावांत सात बळी घेतले. बेंगळुरूची पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय फलंदाजीतील उणिवा स्पष्ट झाल्या व फिरकी गोलंदाजांचे पितळही उघडे पडले होते. त्यामुळे पुढील कसोटी जिंकण्यासाठी अश्विन, जडेजा, अक्षर, कुलदीप याशिवाय वेगळं ट्रम्प कार्ड भारताजवळ असणं गरजेचं होतं. त्यातच रणजित ताजं ताजं दीड शतक व गोलंदाजीत चमकदार कामगिरी केलेला वॉशिंग्टन सुंदर संघ व्यवस्थापन व निवड समितीच्या नजरेत बसला व तत्काळ त्यांनी त्यांना संघात घेत अंतिम अकरातही निवडले. त्यावेळी संघ व्यवस्थापनावर चौफेर टीका झाली. मात्र, प्रथम चेंडू हाती येतान वॉशिंग्टनने फिरकी गोलंदाजीचा सुंदर नजराणा पेश करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची शब्दशः परीक्षाच घेतली. किवीज फलंदाजांसाठी जणू हा एक आउट ऑफ सिलॅबस प्रश्न होता. त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हतेच. सुंदरच्या या अप्रतिम कामगिरीमुळेच टीम इंडियाला पुन्हा सामन्यावर वर्चस्व मिळविता आले.
-डॉ. दत्ता विघावे ( ९०९६३७२०८२ )