तुम्हालाही डिजिटल अरेस्टचा धोका
'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले बचावाचे उपाय
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-28 12:18:15
नवी दिल्ली : प्रत्येक युगात देशासमोर आव्हाने आली आहेत आणि त्या आव्हानांना आपण यशस्वीपणे तोंड दिले आहे. सध्याच्या काळात डिजिटल अरेस्ट हा चिंतेचा विषय बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ११५ व्या मन की बात कार्यक्रमात सांगितले.
डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोटाळे आणि लोकांची फसवणूक सुरू आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, डिजिटल अरेस्टच्या कारनाम्यात गुंतलेले लोक फोनवर असे काही वातावरण तयार करतात की, आपण घाबरून जातो. हे करा, ते करा, अन्यथा अटक केली जाईल, अशी भीती घातली जाते. मात्र ही शुद्ध फसवणूक असते, हे लक्षात ठेवा. या सर्वांपासून वाचायचे असेल तर तीन कामे करायची. थांबायचे, विचार करायचे आणि कृती करायची. प्रत्येक वर्गातले आणि वयोगटाचे लोक डिजिटल अरेस्टला बळी पडत आहेत.
आपल्या मेहनतीचे लाखो रुपये गमावत आहेत. केव्हा कोणीही अशा प्रकारचे फोन करतील, तेव्हा त्याला सर्व माहिती सांगण्याआधी काही वेळ थांबायचे. कोणतीही सरकारी संस्था फोनवर माहिती विचारत नाही.
या संस्थांकडून डिजिटल अरेस्टच्या धमक्या दिल्या जात नाहीत, हे सर्वप्रथम लक्षात ठेवायचे. यानंतर राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर दूरध्वनी करत फसवणुकीपासून वाचण्यासाठी कृती करायची, असे मोदी यांनी नमूद केले. प्रत्येक क्षेत्रात देश कमाल करीत असून, ॲनिमेशनच्या बाबतीत आपण मजल मारत आहोत. ऑनलाइन गेमिंगच्या क्षेत्रातसुद्धा भारताने भरीव कामगिरी केली असल्याचे सांगत मोदी यांनी या क्षेत्रात कार्यरत लोकांचे कौतुक केले.