भारत-चीन सीमेवर आज हॅप्पी दिवाळी

दोन महत्त्वाच्या ठिकाणी समझोता सफल

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-31 12:45:38

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात २०२० पासून सुरू असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांनी वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याचे तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटविण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, सीमेवरील सैन्य मागे घेण्याची तसेच चौकी हटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे देप्सांग पठार आणि देम्चोक या दोन ठिकाणी आता भारतीय सैनिकांना मे २०२० पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही देशांतील सैन्य अधिकारी गुरुवारी (दि. ३१) एकमेकांना मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत.
            आता दोन्ही देशांचे अधिकारी या भागांची पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान ड्रोन्सची मदतही घेतली जात आहे. पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. मात्र, भारतीय सैनिकांना याची पूर्वकल्पना चीनच्या सैनिकांना देणे बंधनकारक आहे. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे.  महत्त्वाचे म्हणजे, अशाच प्रकारची व्यवस्था आता अरुणाचल प्रदेश सीमेवरील वादग्रस्त भागांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न  असल्याचे लष्काराच्या सूत्रांनी सांगितले आहे. मे २०२० पासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये सीमेवर तणाव आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यामध्ये २० जवान शहीद झाले होते, तर अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते. गेल्या काही दशकांतील हा सर्वांत भीषण संघर्ष होता. चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतर, काही दिवसांपूर्वी या भागातून सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती.